प्रमोद येरावार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घरात अठराविश्वे दारिद्र्य, दोनवेळचे जेवण रोज मिळेल, याची शाश्वती नाही. भीक मागून मिळेल ते खाऊन आयुष्य घालविणाऱ्या मायलेकीचा भुकेनेच अखेर बळी घेतला. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील वाॅर्ड क्रमांक ५ मधील त्यांच्याच घरात माय व तिच्या लेकीचा शनिवारी मृतदेह आढळून आला. भूकबळीच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. (Awful; Starved to death of mother and daughter)
झेलाबाई पोचू चौधरी (आई) व माया मारोती पुलगमकर (मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. कोठारी येथे चौधरी कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. पोचू चौधरीचे बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पत्नी आणि मुलगी हेच हयात होते. मुलीचे लग्न झाले. मात्र तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिल्याने ती आईकडेच राहत होती. आई आणि मुलीला जगण्याचे कुठलेही साधन नव्हते. या दोघीही भिक्षा मागून आपला चरितार्थ चालवीत होत्या.
झेलाबाई पोचू चौधरी बऱ्याच दिवसापासून आजारी होत्या. मुलगी गावात भिक्षा मागून आईला व स्वत:ला जगवू लागली. अशातच मुलगी माया मारोती पुलगमकर हिलासुद्धा आजाराने विळखा घातला. आजारामुळे ती भिक्षा मागायला जाऊ शकत नव्हती. अखेर शनिवारी दोघेही घरातच मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती स्थानिक पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनास कळताच घटनास्थळ गाठून दोघींचाही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. आजार आणि भुकेने दोघांचाही मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात कुणी नातलग आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.