लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी २३ सप्टेंबर २०१८ पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ४२ कुटुंबांना गोल्डन कार्ड वितरण करून आरोग्यकवच देण्यात आले. आरोग्य विभागाकडून योग्य पाठपुरावा सुरू असून लवकरच इष्टांक पूर्ण होणार आहे. जानेवारी २०२० पर्यंत ६ हजार ९४१ रूग्णांना विमा लाभ मिळाला आहे.२०११ च्या जनगणनेमधील नोंदीनुसार आयुष्यमान भारत योजनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे २ लाख ७ हजार लाभार्थी निवडण्यात आले आहेत. कार्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कार्ड वितरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा, अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना योजनेची जनजागृती करून लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला. २०११ ला झालेल्या जनगणनेतील सर्वेक्षणातील कुटुंबांना सदर योजनेतंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा दिल्या जाते. याकरिता केंद्र शासन ६० टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के आर्थिक वाटा उचलतो. योजनेतंर्गत गरीबांना खासगी रूग्णालयातही चांगले उपचार मिळतील. यामध्ये कर्करोग, हृदयाचे आजार, मुत्रपिंड व लिव्हरचे आजार, मधुमेह आदी आजारांसह १ हजार ३०० आजारांचा समावेश आहे. लाभार्थीच्या कुटुंबासाठी सुमारे १ ते दीड लाखांपर्यंत आरोग्य विम्याचीही तरतूद करण्यात आली. त्यावरील आरोग्यसेवेची गरज पडल्यास त्याचा खर्च थेट राज्य सरकारमार्फत करण्यात येईल, असा विचारही सध्या सरकारकडून केला जात आहे. विमा कंपन्यांसोबत संपूर्ण रकमेचा म्हणजेच ५ लाखांचा विमा करार केल्यास हप्त्याची रक्कम वाढेल, त्यामुळे अतिरिक्त हप्त्याचा विचार करून हा सुवर्णमध्ये काढण्यात आला आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने जिल्ह्याला दिलेले लक्ष्यांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाने प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे.११ कुटुंब प्रकारांना मिळतो लाभआयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत शहरी भागातील ११ कुटुंब प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये कचरावेचक, बांधकाम मजूर, घरकाम, फेरीवाले, भिकारी आदी कुटुंबानांही लाभ दिला जातो. ग्रामीण भागात घरांची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी कुटुंबांची निवड केली जाते.जिल्ह्यातील १५ तालुक्यातील गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा, अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्मान भारत योजनेची जनजागृती सुरू आहे. पात्र कुटुंबांची केवायसी नोंदविण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून गरजु कुटुंबांतील व्यक्तींसाठी ही योजना नवसंजीवनी ठरली आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.
१ लाख ८८ हजार ४२ कुटुंबांना ‘आयुष्मान’चे आरोग्यकवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:00 AM
२०११ च्या जनगणनेमधील नोंदीनुसार आयुष्यमान भारत योजनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे २ लाख ७ हजार लाभार्थी निवडण्यात आले आहेत. कार्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कार्ड वितरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा, अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना योजनेची जनजागृती करून लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला.
ठळक मुद्देगोल्डन कार्ड वितरण : ६ हजार ९४१ रूग्णांवर मोफत उपचार