मासळ(बु) : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातही शासनाकडून ३१ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आपले सरकार, सेतू सुविधा केंद्र तसेच इंटरनेट कॅफे बंद आहेत. शेतकऱ्यांनी आता २० मेपर्यंत महाडीबीटीवरील योजनांसाठी अर्ज करायचा कसा, असा प्रश्न पडला आहे.
परंतु टाळेबंदी असल्याने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.
राज्य शासनाच्या अनेक योजनांचा महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज भरून शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. खरिपाचा हंगाम सुरू झाला असून बियाणे लागवडीसाठी शेतकऱ्यांना भात, तूर, सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी बी-बियाणे ५० टक्के अनुदान तत्त्वावर मिळणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर मुदत मिळाली असून, २० मेपर्यंत अर्ज भरावे लागणार आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे आपले सेवा केंद्र, सेतू केंद्र, इंटरनेट कॅफे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा तरी कसा, अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर ऑनलाइन अर्जाद्वारे शेतकऱ्यांना योजनेची निवड करण्याचे अधिकार दिले आहे. राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी भात, कापूस, सोयाबीन, तूर व ज्वारी आदी बी- बियाणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. परंतु अर्ज भरून देणारे ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. इंटरनेट व इतर माहितीच्या अभावामुळे योजनेचा लाभ घेता येणार किंवा नाही, यांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अर्ज सादर करण्यासाठी प्रशानाकडून पर्यायी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.
बॉक्स
वाहतूक सेवा बंद
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महाडीबीटीवर माहिती भरताना अनेक अडचणी येत असून, अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जात आहेत. त्यातही बससेवा व खासगी प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
कोट
लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना बी- बियाणांसाठी अर्ज भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने सेतू सुविधा केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी.
-नितेश गणवीर, शेतकरी मासळ ( बु ).