लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : धान कापणीसाठी लागणाऱ्या विळा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुचाकीस्वार बाप-लेकीला अवैध वाळूतस्करी करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने धडक देऊन उडविले. यात मुलगी व वडील गंभीर जखमी झाले आहेत. यात मुलीचे डाव्या पायाचे हाड मोडले असून, वडिलांचा उजवा पाय मोडला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. पोंभूर्णा तालुक्यात वाळू तस्करांचा मोठा सुळसुळाट चालू आहे. वाळू तस्कर संबंधित विभागाला न जुमानता दिवसाढवळ्या अवैधरीत्या वाळूची तस्करी करीत आहेत. वढकुली नाल्यातून अवैधरीत्या वाळूचोरी करून वाहतूक करताना एमएच ३४ बीजी २३१५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे चालक लक्ष्मण नेवारे याने भरधाव ट्रॅक्टर चालवून चेक फुटाणा येथील राजू मेश्राम (३८) व मुलगी धनश्री मेश्राम (१०) यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र दोघांचेही पाय मोडले असल्याने व प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहे.