चंद्रपूर : देशात सामाजिक समता रुजविण्याचे महत्वपूर्ण काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असून दलित, शोषित, पीडित व दुर्बल घटकांसाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य झिजविले आहे. सामाजिक समतेसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य व त्यांचे विचार समाजासाठी आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिलदरम्यान चंद्रपूर जिल्हयात सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ आज बुधवारी सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रभारी जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी व समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर यावेळी उपस्थित होते. गरिबातील गरीब व्यक्तीला सन्मानाने जगता यावे, यासाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. शिक्षण व सामाजिक एकता यासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य यामुळेच आपण आज प्रगतीपथावर आहोत. आर्थिक दुर्बल घटकासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला देश आजही विसरला नाही. ग्रामीण भागातील गोरगरिबांचा विकास त्यांनी नेहमी डोळयासमोर ठेवला म्हणून आज या महामानवाला देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आठवले जाते, असे संध्याताई गुरुनुले म्हणाल्या.समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक समता रुजविण्याचे काम छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शासनाने सामाजिक समता सप्ताह आयोजित करुन या महामहानवांना खरी श्रध्दांजली अर्पण केल्याचे त्या म्हणाल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील असल्याचा सार्थ अभिमान असून समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य समाजाला नवी दिशा देणारे असल्याचे मत आशुतोष सलील यांनी व्यक्त केले. सामाजिक समता सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी नेहमी आग्रह धरला आहे. त्यांच्या या आग्रहामुळे आज समाजाने प्रगती साधली असल्याचे त्यांनी सांगितले.सामाजिक सप्ताहादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती प्रसाद कुळकर्णी यांनी प्रास्ताविकातून दिली. उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बाबासाहेबांचे विचार समाजाला आजही प्रेरणादायी
By admin | Published: April 09, 2015 1:18 AM