लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिदर्शी कार्यामुळे भारतातील शोषितांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेले ऐतिहासिक कार्य भारतच नव्हे तर जगासाठी वंदनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, अर्थ, नियोजन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमासाठी पाठविलेल्या संदेशातून केले आहे.मंचावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, अशोक घोटेकर, वामनराव मोडक, अॅड. राहुल घोटेकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जुल्फी शेख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार संदेशात पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी मूलगामी धोरण तयार केले. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून कटाक्षाने अंमलबजावणी केली जात आहे. उपेक्षित समाज घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास साध्य करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. या निर्णयामागे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा आहे. चंद्रपुरातील दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही ना. मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या संदेशातून दिली आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची दीक्षा दिल्याने देशातील कोट्यवधी दलितांची अस्मिता जागृत झाली. गावखेड्यांतील शोषित माणसापर्यंत सामाजिक न्यायाचा विचार पोहोचला. सामाजिक न्यायासाठी आपण कधीही तडजोड करणार नाही, असेही ना. आठवले म्हणाले. कलावंत हेमंत शेंडे व संचाने रात्री प्रबोधनात्मक गीते सादर केली.
बाबासाहेबांचे कार्य जगासाठी वंदनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:48 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिदर्शी कार्यामुळे भारतातील शोषितांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळाली.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचा समारोप