चंद्रपूर : प्रसृत मातेला एचआयव्ही असल्याची शेजारणीने खोटी बतावणी केली. त्याच्या संसर्गाचा बाळाला धोका आहे. त्यामुळे बाळ एनजीओकडे सुपुर्द केल्यास बाळावर योग्य उपचार होईल व बाळ सुरक्षित राहील, असे सांगून बाळाची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून असा प्रकार आणखी कुठे कुठे घडला, याचाही तपास आता पोलीस करीत आहेत.
मीना राजू चौधरी (३४), रा. श्यामनगर चंद्रपूर, जाबीर रफिक शेख (३२), रा. बल्लारपूर, अंजुम सलीम सय्यद (४३), रा.भिवापूर वाॅर्ड चंद्रपूर, वनिता मुलचंद कावडे (३९), पूजा सुरेद्र शाहू (२९), स्टॉफ नर्स, शालिनी गोपाल मोडक (४८), स्टॉफ नर्स, रा. नागपूर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मीना चौधरी ही प्रसृत मातेच्या घराशेजारी राहते. प्रसृत होण्यापूर्वी मीना तिला रुग्णालयात भेटायला जात होती. दरम्यान प्रसृती झाल्यानंतर १५ जानेवारी रोजी त्या मातेची रुग्णालयातून सुटी झाली. मात्र मीनाने तुला एचआयव्ही असून त्याचा बाळाला धोका असल्याची खोटी बतावणी केली. त्यामुळे हे बाळ नागपूर येथील लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या एनजीओकडे सुपुर्द करू, असे सांगून तिला घरी नेण्याएवजी लोहारा येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. यावेळी त्या मातेने बाळाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या काळजाच्या तुकड्याला नागपूर येथून आलेल्या तीन महिलांच्या ताब्यात दिले.
तीन दिवसांनंतर मीना चौधरीने त्या मातेच्या घरी जाऊन तिला ४९ हजार रुपये दिले. मातेने कशाचे पैसे आहेत. अशी विचारणा केली असता आपले बाळ सांभाळत असल्याने त्यांनी आपल्याला हे पैसे दिले असल्याचे सांगितले. मात्र, त्या मात्रेला संशय आला. तिने बाळाला भेटायचे असल्याचे सांगितले. यावेळी मीना उडवाउडवीचे उत्तर देऊ लागली. त्यामुळे मातेने मीना चौधरी हिने आपल्या बाळाला विकले असल्याचा संशय अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून व्यक्त केला. त्यांनी लगेच रामनगर पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तपास करण्यास सांगितले. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या पथकासह पुढील कार्यवाही करण्याकरिता रवाना करण्यात आले. त्यांनी सहा जणांना अटक केली. बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले.
नर्सच्या मदतीने केली विक्री, बाळ सुखरुप
तक्रार दाखल होताच, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कापडे यांनी मीना चौधरी हिला ताब्यात घेतले. तिची विचारपूस केली असता, तिचा प्रियकर जाबिर रफिक शेख व अजुम सलीम सय्यद यांच्या मदतीने नागपूर येथील वनिता कावडे, पूजा शाहू, शालिनी गोडक याना दोन लाख ७५ हजार रुपयाला बाळ विकल्याचे कबूल केले. दरम्यान, कापडे यांचे पथक नागपूरकरिता रवाना झाले. त्यांनी त्या महिलांची माहिती घेतली असता, त्या नर्स म्हणून काम करीत असल्याचे सामोर आले. त्यांनी नागपूर येथून वनिता कावडे, स्टॉफ नर्स पूजा शाहू, स्टॉफ नर्स शालिनी मोडक या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चंद्रपूर येथील स्मिता मानकर हिला विकल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता, ते बाळ सुखरूप असल्याचे दिसून आले. नवजात बालकास ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता दाखल करण्यात आले.