अनवर खान
चंद्रपूर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू हे मंगळवारी जिवती तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. रात्री १२ वाजता ते सीतागुडा या कोलामगुड्यात पोहोचले. कोलामगुड्यासह परिसरातील गावकरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते २५-३० कि.मी. अंतरावर असलेल्या गडचांदूर येथे जाऊन विश्रामगृहात मुक्काम करू शकले असते. मात्र त्यांनी कोलामगुड्यातच रात्र काढण्याचा निर्णय घेतला.
त्या खेड्यातील एका घरी मोकळ्या जागेत खाटेवरच ते झोपले. दिवसभराच्या दगदगीमुळे ते त्या खाटेवर निवांत झोपीही गेले. चक्क एक मंत्री एका गुड्यावर रात्र काढतो ही प्रशासनासह तेथील गावकऱ्यांनाही अचंबित करणारी बाब ठरली. नाईलाजाने तालुका प्रशासनालाही त्यांच्यासोबतच तिथेच रात्र घालवावी लागली.
जिवतीचे तहसीलदार चिडे, पोलीस व काही अधिकाऱ्यांचा ताफाही त्यांच्यासोबत होता. कडू एवढे गाढ झोपले की थेट सकाळीच त्यांना जाग आली. सकाळी सीतागुडा येथील कोलाम बांधवांशी मोकळेपणाने त्यांनी संवाद साधला. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. यावेळी तहसिलदार, तलाठी, तालुका आरोग्य अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, पंचायत समितीचे बीडीओ, कृषी अधिकारी अशा अनेक विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोलाम बांधवांनी समस्यांचा पाढा वाचताच कडू यांनी तिथेच अधिकाऱ्यांचा क्लास घेत त्यांचे कान टोचले.
साहेब, अधिकारी बेस बोलत नाही हो...
कुठलेही काम असो, शासकीय कार्यालयात गेले असता तेथील अधिकारी वा कर्मचारी आमच्याशी नीट बोलत नसल्याचे कोलाम बांधवांनी आपल्या भाषेत कडू यांना सांगितले. हे ऐकताच त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला रेशनकार्ड मिळालेच पाहिजे, नागरिकांची कामे प्राधान्याने करा, जनतेची गाऱ्हाणी सुटली नाही तर दहा दिवसात मी पुन्हा येणार, अशी तंबीही त्यांनी प्रशासनाला दिली.