घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : शेतीचे दैवत म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बैलपोळा आता नावापुरताच उरला आहे. नागभीड येथील काही वसाहतीमध्ये आर्जव करूनही बैलजोड्या न आल्याने अनेकांना बैलपुजेशिवाय पोळा साजरा करावा लागला.काळ बदलत आहे, तसे काळाचे तंत्र आणि तंत्रज्ञानही बदलत आहे. २० पंचेवीस वर्षापूर्वी ज्या तंत्राने शेती केली जायची, त्या तंत्राला फाटा देत बहुंतांश शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब केला आहे. याला कारणेही कारणीभूत आहेत. विविध कंपन्याकडून हप्तेवारीवर ट्रॅक्टर व विविध यंत्रे उपलब्ध झाली. कुरणांवर अतिक्रमण झाल्याने व जंगलांचे नियम कडक झाल्याने जनावरांच्या चराईसाठी जागाच उरली नाही. परिणामी शेतकºयांनी गुरे पाळणे बंद केले. याचा परिणाम रविवारी पोळ्यावर दिसून आला. नागभीड येथे बाजार चौक आणि शिवटेकडी अशा दोन ठिकाणी पोळा भरतो. पूर्वी या ठिकाणी बैल कोठे उभी करावीत हा प्रश्न होता. मात्र यावर्षी एका ठिकाणी १४ तर दुसऱ्या ठिकाणी आठ बैलजोड्या आल्या होत्या. या अल्प बैलजोड्यांचा परिणाम पूजेवर झाला. नागभीड येथील काही वसाहतींमध्ये तर बैलजोडी गेल्याच नाहीत. काहींनी आर्जव करून पूजेसाठी बैलजोडी बोलावून घेतली. पण काहींनी आर्जव करूनही बैलमालकांनी बैल आणले नाही. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वाट पाहूनही बैलजोडी न आल्याने अनेकांना बैलपुजेविनाच पोळा साजरा करावा लागत आहे.
बैलपोळा उरला आता नावापुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:46 PM
शेतीचे दैवत म्हणून ज्यांना ओळखले जाते. त्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने बैलपोळा आता नावापुरताच उरला आहे. नागभीड येथील काही वसाहतीमध्ये आर्जव करूनही बैलजोड्या न आल्याने अनेकांना बैलपुजेशिवाय पोळा साजरा करावा लागला.
ठळक मुद्देपैशाची चणचण : शेतकऱ्यांमध्येच निरूत्साह