चिमूर (चंद्रपूर) : वाघांची झुंज ऐकली आहे. मात्र ती ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बघितली. दोन वाघांमध्ये शिकारीवरून झालेल्या या झुंजीत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला. जखमी वाघ जवळच एका झुडपात बराचवेळ बसून होता. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी 'लोकमत'ला दिली. ही थरारक झुंजीची घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास चिमूर तालुक्यातील वाहानगावचे शेतकरी सुभाष दोडके यांच्या शेतात घडली. शुक्रवार, १० नोव्हेंबरला छोटा मटका नावाच्या वाघाने एका बैलाची शिकार केली होती. या शिकारीवरून या दोन्ही वाघांमध्ये टोकाची झुंज झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
ग्रामस्थांच्या डोळ्यांदेखत झुंजीचा थरार
वाहानगाव येथील काही ग्रामस्थ दुपारी शेतात गेले असता त्यांना दोन वाघांमध्ये जोरदार झुंज होत असल्याचे बघायला मिळाले. त्यांनी लगेच गावाच्या दिशेने धाव घेत हा प्रकार गावकऱ्यांना सांगितला. त्यानंतर ग्रामस्थ झुंज बघण्यासाठी शिवारात पोहचले. मात्र झुंज संपलेली होती. यामध्ये एक वाघ जागीच गतप्राण झालेला होता. तर दुसरा वाघ जखमी अवस्थेत शेतालगतच्या जंगलातील झुडपात बसून होता. वाघांना बघण्यासाठी गावकयांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी मृत वाघासोबत सेल्फीही काढला. छोटा मटका बजरंगवर भारी ठरल्याची चर्चाही यावेळी रंगल्या.