लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सर्वत्र सुरु आहे. या कामामुळे ग्रामीण भागात दरवर्षी मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र तेंदूपत्ता संकलन केलेल्या पान फळ्यावर बालमजुरांना अल्पशी मजुरी देऊन त्यांच्या हातून पुडके पलटविण्याचे काम केले जात आहे. याकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने कंत्राटदारांचे चांगलेच फावत असून बालमजुरांचे मात्र शोषण होत असल्याचे चित्र आहे.मूल तालुक्यातील निम्मे गावे ही कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत होती. मागील वर्षी कोठारी वनपरिक्षेत्राचे विभाजन होऊन पोंभुर्णा वनपरिक्षेत्राची निर्मिती झाली. आता ही गावे पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात समाविष्ट आहेत. भेजगाव, येरगाव व परिसरातील बहुतांश नागरिक तेंदूपत्ता संकलन करीत असून गावच्या तेंदूफळीवर पुडके नेत असतात. मात्र येथील पान फळीवर बालमजुरांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याचे दिसून आले. १६ वर्षाखालील अनेक मुले पुडके पलटविण्याच्या कामात गुंतले असून यात त्यांचे शोषण होत आहे. वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.बालमजुरांकडून कामे करवून घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र पुडके पलटविण्याच्या कामावर कंत्राटदार बालमजुरांना वाजवीपेक्षा अंत्यत कमी मजुरी देत त्यांना राबवून घेत आहेत. परिसरातील मजूर पुडके पलटविण्याच्या कामावर जायला मागेपुढे पाहतात. त्यामुळे या कामासाठी सर्रासपणे बालकांचा वापर करुन उघडपणे नियमांचे उल्लंघन सुरु आहे. सध्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे घरी बसलेली मुले थोड्या पैशाच्या लोभाने कामात गुंतली आहेत. या बालकांना अल्प मजुरी देवून सकाळ-संध्याकाळ असे राबविल्या जात आहे.खेळण्या बाळगण्याच्या व शिकण्याच्या वयात बालकांच्या हाताला काम देवून भर उन्हात ते कष्ट उपसत असल्याने या प्रकाराला जबाबदार कोण, वनविभाग की कंत्राटदार, हे मात्र अनुत्तरीत आहे. बाल मजुरांना कामावर ठेवणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
तेंदूपत्ता पुडके पलटविण्याच्या कामावर राबतात बालमजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:59 PM
सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सर्वत्र सुरु आहे. या कामामुळे ग्रामीण भागात दरवर्षी मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र तेंदूपत्ता संकलन केलेल्या पान फळ्यावर बालमजुरांना अल्पशी मजुरी देऊन त्यांच्या हातून पुडके पलटविण्याचे काम केले जात आहे.
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : वनाधिकारी व कर्मचारी अन्नभिज्ञ