लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सेवादासनगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा गावातून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी रात्रभर जागावे लागत असून शेतकरी दिवसभर मशागतीची कामे सोडून पाण्यासाठीच भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या सेवादासनगरात दरवर्षीच पाण्याची भीषण टंचाई असते. फेब्रुवारी महिन्यापासुनच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शेतीच्या मशागतीचे कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना बैलबंडीतून पाणी आणणे सुरू केले. जिल्हा परिषद सदस्य कमल राठोड या सेवादासनगरातील रहिवाशी आहेत. लगतच्या गावातच पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती राहतात. पण, तालुक्याचे तर सोडाच पण शेजारच्या गावात जाऊन पाणी टंचाईची स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यास वेळ नसल्याची टीका गावकरी करीत आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळेच पाणी टंचाईची समस्या दूर झाली नाही.पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापुरातही हीच स्थिती आहे. शिवाय, परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नाही. महिला हैराण झाल्या आहेत. पं. स. सदस्य अंजना पवार यांनी सेवादासनगरातील जलसंकटाविषयी अधिकाऱ्यांना पत्र दिले. परंतु समस्या जैसे थे असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. येत्या सात दिवसांत गावातील पाणी समस्या सोडविली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
सेवादासनगरवासी बैलबंडीने आणतात तेलंगणातून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:44 AM
नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सेवादासनगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा गावातून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे.
ठळक मुद्देगावकरी हैराण : पाण्यासाठी रात्रभर जागरण