गोवरी : राजुरा तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार आहे. पावसाचा चांगला फायदा झाल्याने काळ्या मातीच्या कुशीत बीज अंकुरणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, माथरा, पोवनी, साखरी, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव, मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, कढोली व तालुक्यातील बहुतांश भागात दोन-तीन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाने एंट्री केल्याने यंदा प्रथमच शेतकऱ्यांना पाऊस येण्याची प्रतीक्षा करावी लागली नाही. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकणी केलेले कपाशी बियाणे काळ्या मातीच्या कुशीत अंकुरणार आहे. यावर्षी कोरोना संकटावर मात करीत वादळ, वाऱ्याची पर्वा न करता बळीराजाने मोठ्या उमेदीने मशागत करून खरिपातील पिकांची लागवड केली. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून बहुतांश शेतकऱ्यांनी महागडे बियाणे जमिनीत टाकले. मृग नक्षत्रापासून सारखा पाऊस बरसत आहे. बहुतांश सर्वच ठिकाणी पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे.