लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधून प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंटनी भरलेली मालगाडी सोमवारी संध्याकाळी गोल पुलाजवळ उतरल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तब्बल ५ तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे ( रेल्वे वॅगन ) रुळावर घेतले. रात्री ११ वाजता तेलंगाणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला.
ही मालगाडी अंबुजा सिमेंट भरून बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती, परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉइंटवर ३ डब्बे रुळावरून घसरले. घटनेची माहिती इंजिनिअरिंग विभागाने तात्काळ नागपूर डीआरएम मुख्यालयास कळवली नागपूर येथील रेल्वे विभागाचे सहायक डीआरएम सतपती, स्टेशन मास्टर रामलालसिंग, येथील विभागीय हायक इंजिनिअर एन.ए.नागदेवे यांच्या देखरेखी खाली वर्धेवरून आलेल्या क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमेन यांनी रेल्वे वॅगन बाजूला करण्यात यश मिळविले व डब्बे यार्डमध्ये उभे करण्यात आले आहे. घटना स्थळाची पाहणी येथील रेल्वे डीआरयूसीसी चे सदस्य जयकरणसिंग बजगोती यांनीही केली.
घटनेच्या वेळी पाऊस सुरु होता. ही घटना नेमकी गोल पुलावर घडली. डब्बे खाली पडले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण गोलपुलाखालील रस्ता हा जाण्यायेणाऱ्यांचा वर्दळीचा असतो. कोरोना संकटामुळे सध्या बल्लारशाह स्थानकावर दिल्ली व आंध्रप्रदेश कडून येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे ट्राफिक जाम होण्याची पाळी आली नाही