बल्लारपूर : अपघात घडू नये, घडला तरी डोक्याला इजा होऊ नये, याची दक्षता म्हणून दुचाकी चालकांनी हेल्मेट घालणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात आपली आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची सुरक्षितता आहे, असा हा मोलाचा संदेश बल्लारपूर जेसीसने जनजागरण रॅली काढून दिला. या रॅलीच्या दर्शनी भागात गणेश रूपात दुचाकीवर रोहित चंदेल बसले होते. त्यांनी तशा संदेशाचे फलक हाती घेऊन अपघातानंतर ‘मला पर्याय मिळाला, तुमचे काय? हेल्मेट घालाच’, असा आग्रह बाप्पा करीत होते.सध्या जेसीस सप्ताह विविध कार्यक्रमात सुरू आहे. बल्लारपूर जेसीसने सप्ताहाचा प्रारंभ या जनजागरण रॅलीने केला. बालाजी वॉर्डात या रॅलीचा प्रारंभ होऊन पेपर मिल, कलामंदिर, गुरूनानक महाविद्यालय, रोहित होंडा असे फिरून निर्भय ट्रान्सपोर्ट येथे समारोप झाला. रॅलीदरम्यान, मोक्याच्या ठिकाणी जेसीसचे अध्यक्ष राजेश गिदवानी, प्राचार्य अनुप कुटेमाटे, गोपाल खंडेलवाल, प्रकाश दोतेपल्ली, अनिता गिदवानी, पूनम काबरा यांनी हेल्मेट घालणे का गरजेचे आहे, याविषयी सांगितले. रॅलीत सुमारे ५० दुचाकी वाहनधारक स्त्री-पुरुष हेल्मेट घालून सहभागी झाले होते. प्रकल्प निर्देशक तेजिंदरसिंग दारी, गोपाल खंडेलवाल, विकास राजूरकर, संजय कोपरकर, मनोज खत्री यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. डॉ. सत्यनारायण तोटम, संजय गुप्ता, प्रदीप भास्करवार, सीमा कुटेमाटे, शालू पोफळी, विनोद काबरा, गीता ओहरी, दिलीप शहा, रवींद्र फुलझेले, रितेश खटोड, इब्राहिम जव्हेरी आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
बल्लारपूर जेसीसची जनजागरण रॅली
By admin | Published: September 19, 2016 12:55 AM