विवेक ओबेरॉय : फिल्मी अंदाजावर घेतल्या युवकांच्या टाळ्याबल्लारपूर : भारत देशाला एकसंघ आणि एकजुटीने ठेवण्याची गरज आहे. त्याकरिता, प्रांत व भाषावादापासून दूर असणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. ही भावना मिनी भारत म्हणून ओळख असलेल्या बल्लारपूर शहरात गेले कितीतरी वर्षांपासून कायम आहे. ती भावना जनतेने आणि विशेषत: युवकांनी कायम ठेवावी. असे बंधुभाव व समतेचे वातावरण देशात सर्वत्र असायलाच हवे, असे मनोगत चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय याने येथे युवकांशी संवाद साधताना व्यक्त केले. त्याच्या वक्तव्याला आणि फिल्मी अंदाजाला टाळ्या देत युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.येथे निर्माणाधिन असलेल्या शासकीय सांस्कृतीक भवनाच्या संरक्षक भिंतीच्या पायाभरणीचा कार्यक्रम गुरूवारी येथे पार पडला. त्यावेळी अतिथी म्हणून अभिनेता विवेक ओबेरॉय उपस्थित होता. याप्रसंगी त्याने आपल्या भाषणातून एकतेचा संदेश दिला. अध्यक्षस्थानी आ.सुधीर मुनगंटीवार होते. मंचावर चंदनसिंह चंदेल, जि.प. चे अध्यक्ष संतोष कुमरे, हरिष शर्मा, रेणुका दुधे, अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, तसेच शिवसेना व भाजपाचे नगरसेवक कार्यकर्ते, रिपाइं आठवले गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसमभाव आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतिक म्हणून पायाभरणी पूजन मोहन पराळकर, गुरुजी मो. फैजान रजा शेख, ज्ञानी त्रिलोकसिंग, भिकू आनंद, फादर जोसेफ कालायील या विविध धर्मातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्थानिक दिलीप टॉकीज समोरील पटांगणावर सभा झाली. त्यात विवेक ओबेरॉय व मुनगंटीवार यांनी विचार मांडले. बल्लारपूर शहरासोबतच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल या गावातही सांस्कृतिक भवन बांधले जाणार असून एकाच विधानसभा क्षेत्रात दोन शासकीय सांस्कृतिक भवन असे पहिल्यांदाच घडणार आहे, असे सांगत भवनाच्या निर्मितीवर चार कोटी रुपये खर्च लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात, राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम ठरलेल्या चिंधी बाजार या नाटकाचे दिग्दर्शक, कलावंत तसेच सांस्कृतिक कार्यात योगदानाबद्दल ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर, मधुकर रणदिवे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांचा विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक हरिष शर्मा, संचालन मनिष पांधे आणि आभार किशोर मेश्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
बल्लारपूर मिनी इंडिया सर्वांसाठी प्रेरणादायी
By admin | Published: August 21, 2014 11:47 PM