चंद्रपूर : बल्लारपूररेल्वेस्थानकावर रविवारी झालेल्या रेल्वे ब्रीज दुर्घटनेप्रकरणी बल्लारपूर जीआरपी पोलिसांनी मंगळवारी रेल्वे प्रशासनाविरोधात भादंवि ३०४ (अ) ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला. रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजूरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव यांना निलंबित केले आहे. ही कारवाई मुंबई रेल्वे मंडळ प्रबंधकांनी केली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. मात्र, ते योग्य पद्धतीने केले गेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणात दोन अधिकारी दोषी दिसून आल्याने त्यांच्यावर रेल्वे विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ब्रीज ओके असा संदेश देणारे अधिकारी व संबंधितांवरही निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत आहेत. बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाला भगदाड पडल्याने रविवारी एका महिला प्रवाशाचा मृत्यू, तर १७ जण जखमी झाले हाेते. या घटनेने मध्य रेल्वे प्रशासन खळबळून जागे झाले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे या दोन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर तळ ठोकून आहेत.
'त्या' अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत...
रेल्वे स्थानकावरील क्रमांक एक प्लॅटफार्मवरून दोन आणि तीन क्रमांकाच्या प्लॅटफार्मकडे जाण्यासाठी १९७२ मध्ये ओव्हरब्रीज बनविण्यात आला. त्यानंतर रेल्वेगाड्या वाढताच प्लॅटफार्मचा विस्तार झाला. या लोखंडी रेल्वे पुलाचे ३१ वर्षांनंतर २००३ मध्ये पुनर्निरीक्षण करण्यात आले. या पुलावरून २५ प्रवासी जाऊ शकतात, एवढीच क्षमता आहे; परंतु प्रशासनाने प्रवाशांच्या संख्येकडे लक्ष दिले नाही. तेव्हापासून हा पूल दुर्लक्षित होता.
विशेष म्हणजे, सहा महिन्यांआधी १४ मे २०२२ रोजी मध्य रेल्वेचे मुंबई येथून महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी विशेष रेल्वे गाडीने रेल्वे प्रशासनाचा ताफा घेऊन बल्लारपूर रेल्वेस्थानकाच्या निरीक्षणासाठी आले. तेव्हा येथील आयओडब्ल्यू रेल्वे विभागाचे विभागीय अभियंत्यांनी पुलाची रंगरंगोटी करून हा ब्रीज ओके असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला. त्यामुळे बल्लारपूर रेल्वे विभागातील दोन अभियंता व दोन एरिया ऑफिसरवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
दरम्यान, मंगळवारपासून वस्तीकडे जाणारा रेल्वे पूल व स्टेशनच्या आतील रेल्वे पुलावर बल्लारपूर रेल्वे (आरपीएफ) सुरक्षा दलाचे शिपाई रेल्वे प्रवाशांवर नियंत्रण ठेवत आहेत. प्लॅटफार्म क्रमांक एकवरून पाचपर्यंत गेलेल्या लोखंडी पुलाच्या डागडुजी करण्याचे काम दिवसभर सुरू होते.