चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत. यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील गावे ओडीएफ प्लस (ओपन डिफिकेशन फ्री) मानांकनात पात्र ठरली. विदर्भातून पहिला ओडीएफ प्लस तालुका होण्याचा मान बल्लारपूर तालुक्याला मिळाला आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ मध्ये ओडीएफ प्लस करताना उदिमान, उज्ज्वल व उत्कृष्ट या तीन घटकांमध्ये घोषित केल्या जाते. बल्लारपूर तालुक्यात १७ ग्रामपंचायती व २६ गावे आहेत. यापैकी १० गावे उत्कृष्ट या घटकातून ओडीएफ प्लस म्हणून घोषित करण्यात आली. १६ गावे उदिमान या घटकातून ओडीएफ प्लस म्हणून घोषित करण्यात आली. याबाबत बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध वाळके म्हणाले, बल्लारपूर तालुका उदयमान या घटकात ओडीएफ प्लस झाला. यापूर्वी २०१६ मध्ये बल्लारपूर तालुक्याला विदर्भातील पहिला हगणदारीमुक्त तालुका होण्याचा मान मिळाला होता. यशस्वी अंमलबजावणीची परंपरा बल्लारपूर तालुक्याने कायम ठेवली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस तालुका ठरला. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व गावांत स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत भरीव कामे करून चंद्रपूर जिल्हा ओडीएफ प्लस श्रेणीत आणण्याचे कार्य सुरू आहे.
- नूतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता), जि.प., चंद्रपूर