भात पट्ट्यात रोवणीला प्रारंभ : कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ३० हेक्टर क्षेत्रात राबविली पध्दतबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात एकूण खरिपाचे क्षेत्र नऊ हजार ३७९ हेक्टरचे आहे. यामध्ये भात लागवडीचे क्षेत्र दोन हजार ५८७ हेक्टर निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यात शेतकऱ्यांनी २३७ हेक्टर क्षेत्रात पऱ्हाचे बियाणे तर ०.५० हेक्टरमध्ये आवत्याची लागवड केली आहे. तालुका कृषी विभागाने ३० हेक्टरच्या क्षेत्रात श्री पद्धतीने धानाची रोवणी करण्याचे नियोजन केले असून मानोरा, इटोली व कवडजईच्या भाताच्या पट्ट्यात श्रीपद्धतीने धानाची रोवणी केली जात आहे.तालुक्यात शेतकरी भाताची रोवणी पारंपारिक पद्धतीने करण्यास पसंती देतात. परंतु उत्पादनात वाढ करण्याच्या अनुषंगाने तालुका कृषी विभागाने यावर्षी प्रायोगिक तत्वावर ३० हेक्टरच्या धानाच्या पट्ट्यात श्री पद्धतीने भाताची रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. कृषी सहायक प्रशांत गजभिये यांच्या मार्गदर्शनात मानोरा येथील लक्ष्मण देवतळे यांच्या शेतात धानाची रोवण श्री पद्धतीने करण्यात आली. या पद्धतीने भाताची लागवड केल्यास पिकामध्ये तण वाढीचे प्रमाण कमी होत असून मजुरीची काही प्रमाणात बचत होते. सरासरीच्या तुलनेत उत्पादन वाढीस मदत होते.बल्लारपूर तालुक्यात मानोरा, इटोली, कवडजई, कोर्टीमक्ता, मोहाळी, तुकूम, किन्ही येथील शिवार धानाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक भाताचे आहे. येथील भाताच्या उत्पादनावरच परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा आहे. भात पिकाला पाण्याची गरज भासत असल्याने या भागात सिंचनाची सुविधा म्हणून शेततळ्याचे जाळे निर्माण करण्यात आले आहेत. काही प्रमाणात या भागातील शेतकरी गाव तलाव, बोडी, माजी मालगुजारी तलावाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणतात. कोरडवाहू शेतीसाठी साठवणूक केलेले पाणी वरदान ठरत असल्याने कालांतराने शेतकरी पारंपारिक शेती सोबतच श्री पद्धतीच्या भात रोवणीला पसंत करतील, असे कृषी विभागाला वाटत आहे. आजघडीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात भाताची लागवड म्हणून शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. आजतागायत सरासरीच्या तुलनेत ८० टक्के पर्जन्यमान झाल्याने भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मात्र नदी, नाले, जवळील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपूर तालुक्यात श्री पध्दतीने धानाची रोवणी
By admin | Published: July 17, 2016 12:43 AM