बल्लारपूर : येथील वर्धा नदीच्या काठावरील, गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख आणि वैभव आहे. ६०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या किल्ल्याचा काही भाग कोसळला व जीर्ण झालेला असला तरी गत वैभवाच्या बरेचशा खूणा अजूनही चांगल्या स्थितीत आहेत.त्यातील या किल्ल्याचे दोन मोठे जवळ जवळ लागून असलेले प्रवेशद्वार, नदीकाठावरील अष्टकोणी व देखणा राणी महाल आणि घोडपाग (घोडे बांधण्याची जागा) हे प्रमुख व उल्लेखनिय आहेत. गेल्या काही वर्षांपासून या किल्ल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याच्या आत गवत व लहान झाडांनी हा भाग पूर्णत: व्यापून टाकला होता. तो एवढा की, किल्ल्यातील बराच दर्शनीय भाग व ऐतिहासिक सौंदर्य पार त्यात झाकोळून गेले होते. परंतु, आता पुरातत्व विभागाने याकडे लक्ष पुरविले आहे. गवत-झाडांचा झालेला कचरा पूर्णत: काढून व तो जाळून नष्ट करून किल्ल्यातील पूर्ण जागा स्वच्छ व चकचकित केली आहे. एवढेच नव्हे तर पुरातत्व विभागाने याकडे अधिक लक्ष घालून घोडपाग स्वच्छ केला आहे. किल्ल्यातून नदीकडे जाण्याचा पायरीचा मार्गही खुला केला जात आहे. त्याचप्रमाणे, राज्याचे अर्थमंत्री आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने, या किल्ल्यातील ढासळत्या स्थितीत असलेल्या पराकोटांची दुरुस्तीही केली जात आहे. किल्ल्याच्या आत कचरा वाढू नये, याची वेळोवेळी काळजी घेत राहणे गरजेचे आहे. किल्ल्यातील आताच्या टापटीपपणामुळे हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)बल्लारपूरला येथील राजे खांडक्या बल्लारशहाच्या समाधी परिसरात गोंडसभेचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी राज्यातून तसेच इतर प्रांतांमधून आलेल्या गोंड व आदिवासी बांधवांनी आवर्जून या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊन गत वैभवाचे अवलोकन करून समाधान व्यक्त केले. अधिवेशनाच्या तीनही दिवसांत किल्ला परिसर गजबजून गेला होता.
कचरामुक्तीने उजळला बल्लारपूरचा किल्ला
By admin | Published: January 03, 2015 1:02 AM