लोकमत बातमीचा इम्पॅक्ट
बल्लारपूर : बामणी येथील सोमाणी कॉम्प्लेक्ससमोर झुडपे असलेल्या मैदानात १५ कुटुंब आपल्या परिवाराला घेऊन मागच्या दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे वास्तव्यास थांबले आहेत. हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या संदर्भाची बातमी लोकमतला प्रकाशित होताच बल्लारपूरकर त्यांच्या मदतीसाठी धावून आले व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून १५ कुटुंब आपल्या लहान मुलाबाळांसह परिवारास घेऊन बामणी येथे वास्तव्य करीत होते. लॉकडाऊनमुळे त्यांना कुठेही जाता येत नव्हते. यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले होते. याकडे लोकमतने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधताच समाजसेवी संतोष बेताल, श्रुती लोणारे, राकेश सोमाणी, सुमित डोहणे, विकास राजूरकर, प्रवीणकुमार व अनेक समाजसेवी संघटनांचे फोन प्रस्तुत प्रतिनिधीला आले. त्यांना मदत करण्यासाठी सर्वच पुढे आले. सोमवारी दिवसभर भटक्या कुटुंबांना भरभरून मदत मिळाल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
भटक्या कुटुंबाच्या या समस्येबाबत बामणीचे सरपंच सुभाष ताजने यांनी तहसीलदार संजय राईंचवार यांच्याशी बोलणी केली असता त्यांनी या कुटुंबीयांची माहिती पोलीस स्टेशनला द्या, म्हणजे ते चौकशी करून त्यांना मदत करतील, असे सांगितले.