बाळू धानोरकर : घोंघावणारे वादळ एकाएकी शांत झाले

By राजेश भोजेकर | Published: May 30, 2023 11:52 AM2023-05-30T11:52:21+5:302023-05-30T11:56:43+5:30

धानोरकर यांचा शिवसैनिक ते खासदार हा अवघा २० वर्षांचा प्रवास थक्क करणारा होता.

Balu Dhanorkar : Congress lone Lok Sabha MP the roaring storm suddenly calmed down | बाळू धानोरकर : घोंघावणारे वादळ एकाएकी शांत झाले

बाळू धानोरकर : घोंघावणारे वादळ एकाएकी शांत झाले

googlenewsNext

राजेश भोजेकर

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू   धानोरकर यांच्या निधनाची धक्कादायक वार्ता सकाळी धडकताच अख्खा चंद्रपूर जिल्हाच नव्हे ते महाराष्ट्र निशब्द झाला. अवघ्या ४८ वर्ष वयाच्या काळात घोंगावणारे वादळ एकाएकी शांत झाले, यावर विश्वासच बसत नव्हता. बाळू धानोरकर नावाच्या वादळाने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाचा नवा अध्याय लिहिला. सतत १५ वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला गड काँग्रेसला परत मिळवून दिला. शिवसैनिक ते खासदार हा अवघा २० वर्षांचा प्रवास थक्क करणारा होता. अशातच त्यांनी एकाएकी जगाचा निरोप घेऊन मोठा धक्का दिला.

शिवबंधन हाताला बांधल्यापासून बाळू धानोरकर हे नाव सतत चर्चेत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ते एकनिष्ठ होते. काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांच्या मनात बाळासाहेबांचे विशेष स्थान होते. बाळू धानोरकर यांच्या रूपाने एक नवे नेतृत्व चंद्रपूर जिल्हावासीयांना खुणावत होते. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढली. परंतु नेहमीप्रमाणे झालेल्या बंडखोरीमुळे त्यांनाही निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ते मनाने जिंकले होते. २०१४ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा याच मतदार संघातून विधान सभेची निवडणूक लढली आणि ते जिंकले. त्यांच्या रूपाने येथून पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रतिनिधी विधानसभेत पोहचला. विशेष म्हणजे या काळात देशात मोदी लाट आली होती. शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली होती. अशा विपरीत परिस्थितीत हा विजय मोठा होता. यानंतर बाळू धानोरकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

अवघ्या ३९ व्या वर्षी आमदार झालेले बाळू धानोरकर २०१९ मध्ये  खासदार होईल. याची साधी कल्पनाही कोणी केलेली नव्हती. मात्र बाळू धानोरकर यांनी हे करून दाखवले. आमदार असताना त्यांनी चंद्रपूर मतदार संघातून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढली. ही निवडणूक लढणे म्हणजे मोठे धाडस होते. ते त्यांनी केले आणि यशस्वी झाले. त्यांनी इतिहास रचला. भाजप काँग्रेसमुक्त भारतसाठी झटत असताना बाळू धानोरकर यांनी भाजपच्या तावडीतून काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवून दिला. हा साधासुधा विजय नव्हता, तर बाळू धानोरकर नावाच्या मावळ्याने काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यापासून काँग्रेसला वाचविले. ते लोकसभेत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून पोहोचले होते. लोकसभेत त्यांनी मतदार संघातील समस्यांसह देशातील अनेक बाबींवर कटाक्षाने प्रकाश टाकला. त्यांनी अल्पावधीतच दिल्लीतही आपली मजबूत पकड निर्माण केली होती.

काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले असले तरी त्यांचा सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी जवळचा परिचय झाला होता. असे असले तरी ते विरोधकांना नेहमी आव्हान देत असत. त्यांनी मध्यंतरी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून लढण्याची घोषणा करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले होते. खासदार झाल्यापासून ते देशपातळीवर चर्चेत असायचे. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमधील नेत्यांमधील समन्वय तुटल्यागत स्थिती निर्माण झाली होती. यामुळे ते अस्वस्थ वाटायचे.

म्हणतात ना आयुष्य क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. आणि तसेच झाले. २७ मे ०२३ रोजी म्हणजेच तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्याचदिवशी अचानक त्यांचीही  प्रकृती खालावली. त्यांनालगेच नागपूर आणि नंतर दिल्लीला उपचारासाठी हलविले. कोणालाही काहीच कळायला मार्ग नव्हता. एकाएकी काय झाले? सर्वांच्या चेहरे प्रश्नांकित झाले होते. प्रकृती चिंताजनक आहे हे कळताच प्रत्येकजण परमेश्वराकडे त्यांच्या दिर्घआयुष्यासाकडे घालत होते. मात्र वेळ हातून निघून गेली होती. खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चांगली नव्हती.

ते सतत जनसेवेत असायचे. यामध्ये ते स्वतःचे आरोग्य जपण्यात कमी पडले. मंगळवारी सकाळी चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर गेले, ही नकोशी वार्ता धडकली आणि सारेच निशब्द झाले. खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन चटका लावून गेले. वादळ एकाएकी शांत कसे झाले. यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. पण हे कटसत्य आहे. हे पचविण्याची वेळ चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर नियनीने लादली आहे. 

Web Title: Balu Dhanorkar : Congress lone Lok Sabha MP the roaring storm suddenly calmed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.