राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाश्वत पर्यावरणाला अनुकूल आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित रोजगाराभिमुखतेला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची भव्य इमारत उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. बांबूपासून निर्माण होणाऱ्या या डौलदार इमारतीची सिंगापूर देशातील माध्यमांनीही दखल घेतली. ‘द ग्रीन आर्किटेक्चर इन आशिया पॅसिफि क’ हे ब्रिद धारण करणाऱ्या पर्यावरणविषयक ‘फ्युचरिक’ या प्रसिद्ध द्वैमासिकाने जगभरातील पर्यावरणपूरक इमारतींवर विशेषांक प्रकाशित केला असून त्यामध्ये चिचपल्ली येथील बांबूवर आधारित इमारतीच्या वैशिष्ट्यांची नोंद घेतली. विशेष म्हणजे भारतातील अशा प्रकारची ही एकमेव इमारत असून २०१९ पर्यंत इमारत पूर्ण व्हावे, यासाठी दिवसरात्र बांधकाम सुरू आहे.भारतीय वन धोरणातून बांबूला मुक्त करून त्यावरील बंधने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे बांबूचा वापर वाढवून त्यातून रोजगार निर्मिती आणि व्यावसायिक वृद्धी करण्याच्या धोरणांची अमलबजावणी केली जात आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा हे जिल्हे बांबूचे आगार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे बांबूवर आधारीत नवनवे अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांपासून तर शेतकरी, महिलांना सामावून घेणे आणि बांबू मूल्यवर्धनाचे उपक्रम राबविणे, याकरिता चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली. यासाठी राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला. या केंद्रातून बांबूवर आधारित विविध प्रकारच्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. मुख्य इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या इमारतीसाठी सिमेंट व अन्य बांधकाम सामग्रीऐवजी केवळ बांबूचा वापर केला जात आहे. अशा प्रकारची बहुविध पर्यावरणपूरक इमारत भारतामध्ये पहिल्यांदाच उभी होत असून त्यासाठी राज्य शासनाने मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी पर्यावरणपूक इमारतसिंगापुरातील ‘फ्युचरिक’ या जगप्रसिद्ध द्वैमासिकाने मार्च-एप्रिल २०१८ च्या विशेषांकात चिचपल्ली येथील बांबू इमारतीची वृत्तकथा प्रकाशित केली. शिवाय आशिया खंडातील ही सर्वात मोठी पर्यावरणपूक इमारत असल्याचा दावाही केला आहे. याच अंकात हाँगकाँग, इंडोनिशिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, कॅनडा, जपान, चीन देशांमध्ये पर्यावरणपूरक इमारतींची विविधता कशी आहे, जगभरात या क्षेत्रात नेमके काय चालले, याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. वनसंपदा व पर्यावरण क्षेत्रातील घडामोडींचा साक्षेपी आढावा घेणाऱ्या या द्वैमासिकाला जगभरात मोठा वाचकवर्ग आहे.जगभरासाठी आकर्षणस्थळचंद्रपुरातील चिचपल्ली येथे उभी होत असलेली बांबूची देखणी व भव्य इमारत विहित कालावधीतच पूर्ण होणार आहे. जगभरातील इमारतींचा सखोल अभ्यास केल्यानंतर या इमारतीचा नाविण्यपूर्ण आराखडा तयार करण्यात आला. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी, कार्यकर्ते व अभ्यासकांसाठी ही इमारत आकर्षणस्थळ ठरणार आहे.- राहुल पाटील, संचालकबांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चिचपल्ली, चंद्रपूर.
चंद्रपुरातील बांबू इमारतीची सिंगापुरातील माध्यमांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:53 PM
शाश्वत पर्यावरणाला अनुकूल आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित रोजगाराभिमुखतेला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची भव्य इमारत उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.
ठळक मुद्देभारतातील पर्यावरणपूरक इमारतींमध्ये एकमेवफ्यूचरिक मासिकात लागली वर्णी