दीड महिन्यापासून सुरू आहे प्रकार : महिलांसह गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण
निराजकुमार चुनारकर खडसंगी चिमूर तालुक्यातील राज्य महामार्गावर असलेल्या बंदर शिवापूर गावात मागील दीड महिन्यापासून महिलांच्या अंतरवस्त्राची चोरी होत आहे. चोरी गेलेले वस्त्र गावातील मंदिराच्या किंवा शाळेच्या परिसरात ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे गावात शंका कुशंकाना पेव फुटले आहे. सुरू असलेल्या या प्रकारामुळे हे गाव सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकारामुळे महिलांसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कुण्यातरी अज्ञाताकडून गावात केवळ भय निर्माण करण्यासाठी असे कृत्य केले जात असल्याचा अंदाज गावातील सुशिक्षितांकडून बांधला जात असला तरी वयोवृद्ध व विशेषत: महिलांना हा जादूटोण्याचा प्रकार वाटत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या बंदर (शिवापूर) गावात सुशिक्षितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सुशिक्षित युवक या घटनेमुळे गावातील युवक अंधश्रद्धेच्या दृष्टीने या प्रकाराकडे बघत नसले तरी गावातील वयोवृद्ध मात्र या प्रकाराला भानामतीचा प्रकार मानत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये अकारण भितीचे वातावरण पसरत आहे. असे असले तरी गावातील युवक मात्र नागरिकांचे स्वयंस्फुर्तीने समुपदेशन करित आहेत.गेल्या दिड महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. चोरी केलेले अंतरवस्त्र गावातील हनुमान मंदिर किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात अंथरलेल्या दुपट्टयावर ठेवले जात आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरूवातीला गावकऱ्यांनी ेयाकडे कानाडोळा केला. मात्र अलिकडे दोनदिवसा आड या घटना घडत असल्याने नागरिकांनी या प्रकाराची दखल घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्याची माहिती दिली. यादरम्यान, काहींनी हा प्रकार बंद करण्यासाठी बुवाबाजी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र युवकांनी प्रतिसाद न देता सरळ अंधश्रद्धा निर्मुलन समिती व चिमूर पोलिसांना या घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली. महिलांचे अंतरवस्त्र चोरी जाण्याचा प्रकार हा भानामती, किंवा जादूटोण्याचा नसून हे खोडसाळ प्रवृत्ती किंवा विकृत मानसिकतेतून करण्यात येत आहे. याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून नागरिकाने बघावे व कसल्याही प्रकारची भीती बाळगून नये तथा युवकानी याबाबत जनजागृती करावी.- हरिभाऊ पाथोडे, विदर्भ संघटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर