नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जगणे तसे कठीणच, वृद्धापकाळामुळे धावपळही मंदावते. अशातच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनाकरिता तब्बल सात वर्षांपासून सुरू असलेल्या पायपिटीमुळे कंटाळून आत्महत्येचा पर्याय पुढे केला. यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून लालफितशाहीचा परिचय दिला आहे. ही व्यथा म.रा. वीज वितरण कंपनीत जिवती येथून सेवानिवृत्त झालेल्या राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याची आहे.प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागांतर्गत जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जिवती उपक्षेत्रातून २०१५ रोजी तंत्रज्ञ पदावरून बापूजी गणपत जंपलवार हे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन सुरू होणे अपेक्षित होते; परंतु प्रशासनाच्या वतीने काय कार्यवाही झाली माहिती नाही. त्यांची पेन्शन अजूनही सुरू झाली नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते बेडवरच होते. त्यामुळे याबाबत त्यांना साधी चौकशीही करता आली नाही. त्यांचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागाने वरिष्ठांकडे पाठविला; परंतु त्यात काही त्रुटी असल्याने तो परत आला. त्यानंतर प्रशासनाने नेमके काय केले हे कळायला मार्ग नाही. बापूजी जंपलवार यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला, परंतु वीज वितरण कंपनीने त्यांच्या पेन्शनचे तर सोडाच त्यांच्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही.सेवानिवृत्तीनंतर तब्बल सात वर्षांपासून निवृत्तीवेतन मिळत नसल्याने जंपलवार कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावलेले असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकारामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार येऊन त्यांनी दि. २४ मार्च २०२२ रोजी बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन निवृत्तीवेतनाअभावी माझ्यावर आत्महत्येसारख्या पर्यायाची निवड करण्याची वेळ आपण आणली. त्याला जवाबदार तुम्ही राहाल, अशा आशयाचे पत्र देऊन निवृत्तीवेतन त्वरित सुरू करण्याची विनंती केली. परंतु आज त्याही गोष्टीला दोन महिन्याला कालावधी लोटला; मात्र अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही.
बापूजी गणपती जंपलवार यांना निवृत्तीवेतनासाठी तब्बल सात वर्षांपासून वंचित ठेवून वीज वितरण कंपनीने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास वीज वितरण कंपनी विरोधात मोठे आंदोलन पुकारले जाईल. -रामचंद्र मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष, ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती.