भद्रावती (चंद्रपूर) : कर्नाटका पॉवर कार्पोरेशन एकीकृत बरांज खुल्या कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांचा आपल्या हक्कासाठी गेल्या १५ वर्षांपासून लढा सुरू असताना अचानक वनविभागाने स्वतःची जागा या कंपनीला दिल्याच्या वृत्ताने मनोधैर्य खचलेल्या बरांज येथील प्रकल्पग्रस्ताने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी हा प्रकार उजेडात आला.
या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये कंपनी, प्रशासन विरोधात रोष व्यक्त होत आहे. प्रकाश दाजीबा दैवलकर (वय ६०, रा. बरांज) असे या प्रकल्पग्रस्ताचे नाव असून त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रकाश दाजीबा दैवलकर यांनी सतत १५ वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढा दिला. एक दिवस आपणास न्याय मिळेल, अशी त्यांना आशा होती. अशातच कंपनीला आराजी ८४.४१ हे. आर. वनजमीन हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. यामुळे प्रकाश दैवलकर यांचे मनोधैर्य खचले आणि त्यांनी कंपनी प्रशासनाच्या या धोरणाविरोधात एक चिठ्ठी लिहून आपण विष प्राशन करून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे त्यांनी खरोखरच विष प्राशन केले. याची माहिती मिळताच त्यांना नागरिकांनी भद्रावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच
कर्नाटका पॉवर कार्पोरेशन एकीकृत बरांज खुली कोळसा खाण सन २००७ पासून कार्यान्वित आहे. यात बरांज, चिचोर्डी, चेक बरांज, बोनथाळा, कढोली, बरांज तांडा, सोमनाळा ( रिठ ) ही सात गावे समाविष्ट आहेत. ज्याचे क्षेत्रफळ १३७९.५० हे.आर. असून त्यात ६ कोल ब्लॉक आहेत. बरांज कोल ब्लॉकमधून कोळसा काढणे झाले. आता किलोनी कोल ब्लॉकमधून कोळसा काढणे सुरू आहे. हे कोल ब्लॉक बरांज या गावालगत आहे. हे गाव पुनर्वसनात येते. या गावाचे पुनर्वसन करा याकरिता गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींना तसेच प्रशासनाला वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली. आंदोलने केली; परंतु आश्वासनाव्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही.
दैवलकर यांनी आपल्या चिठ्ठीत कर्नाटका एम्टा कंपनीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलो असल्याचे लिहिले आहे. विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा जबाब घेतल्यानंतरच पुढील कारवाही करू.
-संतोष मस्के, सहायक पोलिस निरीक्षक, भद्रावती.