लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१च्या आदेशानुसार सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या २० जागा अनारक्षित झाल्या. १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने जागांवर विजय मिळविण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष आपली शक्ती पणाला लावणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रवर्गातील जागा वळून नुकतीच सहा नगरपंचायतींची निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल अजून जाहीर झाला नाही. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित झालेल्या ओबीसी प्रभागातील सर्व २० जागा अनारक्षित करण्यात आल्या. या जागांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. सावली नगरपंचायतीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वरोराचे एसडीओ सुभाष शिंदे, पोंभुर्णासाठी बल्लारपूर एसडीओ दीप्ती सुर्यवंशी, गोंडपिंपरीसाठी एसडीओ संजयकुमार डव्हळे, कोरपनासाठी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिवतीसाठी चंद्रपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल आणि सिंदेवाही-लोनवाहीसाठी चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांची नियुक्ती झाली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम - २९ डिसेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता नामनिर्देशनपत्र सादर करता येईल.- १ जानेवारी (शनिवार) व २ जानेवारी (रविवार) या सुट्ट्यांच्या दिवशी बंद राहिल. ४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता छाननी होईल. - अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत आहे. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी करता येईल. - निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी, उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी जाहीर राहील. मंगळवारी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान, तर १९ जानेवारी २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे.