चंद्रपूर : गत २४ तासात जिल्ह्यात पाच जणांनी कोरोनावर मात केली, तर सात नवे रुग्ण आढळले. संसर्ग ओसरण्याच्या मार्गावर असतानाच रुग्ण आढळत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये नव्याने भर पडू लागली. एक महिन्यापासून मृताच्या संख्येला मात्र ब्रेक लागला आहे. गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
बाधित आढळलेल्या सात रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील चार, चिमूर एक व भद्रावती तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. चंद्र्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, वरोरा, कोरपना, जिवती तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६५८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ७० झाली आहे. सध्या ४८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ७७ हजार ४९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ८६ हजार ९५३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५४० बाधितांचे मृत्यू झाले आहेत. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.