ब्रह्मपुरी : तब्बल सहा वर्षांच्या बंदीनंतर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली. दारूबंदी उठताच अवैधपणे बनावट दारूचा पुरवठा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येत आहे. हिंगणघाट, गोंदिया जिल्ह्यांतून बनावट देशी दारू सिंदेवाही-पाथरी जंगलात उतरविण्यात येत असल्याची माहिती आहे. तिथून थेट माफियांमार्फत तालुक्यातील विविध गावांत बनावट दारूचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील मद्यपींचा बनावट दारूने बळी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तालुक्यात अनेक गावांत अवैध दारू पुरवठा सुरू करण्यात आला आहे. अधिक नफा कमविण्यासाठी बनावट दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ३०० पेटी भट्टीतला माल तर ७०० - ८०० पेटी बनावट दारू ग्रामीण भागात दररोज पोहोचवली जात आहे. त्यामुळे विषारी दारूच्या सेवनाने मद्यपींचा बळी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालून उचित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बॉक्स
तालुक्यातील या गावात होतो अवैध दारूचा पुरवठा
रात्रीच्या सुमारास जंगलात दारू उतरविली जाते. तिथून तालुक्यातील बेलगाव, कोलारी, तोरगाव, नान्होरी, दिघोरी, कहाली, खेड, वायगाव, अड्याळ, चोरटी, पारडगाव, चौगान, बेटाळा, किन्ही, खरकाडा, रुई, बेलपातळी, मुई, गांगलवाडी, तळोधी खुर्द, मेंडकी, सायगाव, कळमगाव, हळदा, वांद्रा, आवळगाव, मुडझा, पाथरी आदी गावात अवैध दारूचा पुरवठा करण्यात येतो.
बॉक्स
बनावट दारू मिळते अत्यल्प किमतीत
बनावट व विषारी दारू १७०० - १८०० रुपयांत मिळते. खरी दारूची पेटी २७०० - २८०० रुपयांना मिळते. जास्त नफा कमविण्यासाठी दारूमाफिया ही दारू जास्त प्रमाणात खरेदी करून पोहोचती करतात. तर, दाखविण्यासाठी दारूभट्टीतून मोजक्या पेट्या खरेदी करतात. बॅच नंबरमध्ये तफावत असली तरी हुबेहूब खरी असल्याचे दारूच्या शिशीवरून दिसून येते.