चंद्रपूर : बाहेरगावावरून आलेल्या अथवा अन्य जिल्ह्यांमधून भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या व्यक्तीचे नाव, गाव, काम, तसेच अन्य चौकशी न केल्यास एखाद्यावेळी ती व्यक्ती घरमालकांसाठी तसेच समाजासाठी धाेकादायक ठरू शकते. घरामध्ये राहण्यासाठी येणारा चाेरटा अथवा हल्लेखाेर तर राहत नाही ना?, याची खात्री करूनच भाडेकरू म्हणून त्याला ठेवावे. अन्यथा घरमालकांना महागात पडू शकते.
काही शहरांमध्ये अनेक चाेरटे, हल्लेखाेर, तसेच दराेडे टाकणारे लाेक भाड्याने राहून गुन्हा करतात. त्यामुळे शहरांमध्ये घर मालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
भाडेकरू म्हणून आले, चाेरी करून गेले
औद्योगिक शहर म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. त्यामुळे जिल्हा तसेच राज्य, परराज्यातून कामाच्या शोधात अनेक जण येतात. यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लाेक असतात. एखाद्यासाेबत भांडण, तंटा झाल्यास त्याची खुन्नस काढण्यासाठी मारझाेड तसेच चाेरी करतात. अशा घटना मागील काही वर्षांत वाढल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण चौकशी करूनच घर भाड्याने द्यावे.
घर भाड्याने देण्यापूर्वी चौकशी करावी, त्यानंतर भाडेकरूकडून करारनामा लिहून घ्यावा. यासंदर्भात जवळच्या पोलीस स्टेशनला माहितीसुद्धा द्यावी. जेणेकरून भविष्यात एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास त्याचा शोध घेणे सोपे होईल. विशेषत: भाडेकरू काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या कामाचे स्वरूप, तसेच त्याच्या स्वभावाबाबत विचारपूस करावी.
पोलिसांकडे भाडेकरूची नोंद करा
अनाेळखी व्यक्तीला घरात भाडेकरू म्हणून प्रवेश देताना, ताे काेणत्या गावचा रहिवासी आहे, त्याचे आधार कार्ड, संपूर्ण पत्त्याचे कागदपत्र, ओळखपत्र घेऊन पाेलिसांकडे नाेंद करावी.
नोंद कशी करायची?
लहान शहरांमध्ये गुन्हे कमी प्रमाणात घडतात. त्यामुळे कुणी लक्ष देत नाही; परंतु भाडेकरू ठेवताना त्याच्या संपूर्ण माहितीसंदर्भातील कागदपत्रे जमा करून घरमालकांनी स्वत: पाेलीस ठाण्यात नाेंद करावी.
भाडेकरूंची संपूर्ण माहिती गाेळा करावी
भाडेकरू म्हणून घरी राहण्यास आलेल्या व्यक्तीची प्रथम संपूर्ण माहिती घेऊनच घर द्यावे. त्याच्याकडून पत्ता, ओळख यासंदर्भातील कागदपत्रे मागवून घ्यावीत. त्यानंतर पाेलीस ठाण्यात त्याची नाेंद करावी. ही सर्व जबाबदारी घरमालकाने करावी. शक्यतो ओळखीच्याच व्यक्तीला घर भाड्याने द्यावे. त्यामुळे संभाव्य धोके टाळता येतील.
- सुधीर नंदनवार, एसडीपीओ, चंद्रपूर