मूल : येथील उपजिल्हा रुग्णालय, कर्मवीर महाविद्यालय व रेल्वे स्टेशन परिसरात नेहमी वावरणारी अस्वल सोमवारी मूल येथील दिनकर एटलावार वाॅर्ड नं. १६ यांच्या घराजवळ आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत माहिती होताच वनविभाग व पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन अस्वलाला जेरबंद केले व सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. त्यामुळे मूल शहरवासीयानी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मूल शहराला लागून बफर व नॉन बफर वनविभागाचे जंगल असल्याने हिंस्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. काही दिवसापासून कर्मवीर महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालय परिसरात सदर अस्वल फिरताना अनेकांनी पाहिले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अस्वल मूल शहरातील वाॅर्ड नं. १६ मधील दिनकर एटलावार यांच्या घरजवळ फिरताना दिसताच बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांना कळविण्यात आले. त्यानी संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना माहिती दिली. नॉन बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर व वन कर्मचारी तसेच आरआरटी पथक ताडोबा यांच्या मदतीने एक तासाच्या आत अस्वलाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन सुरक्षितपणे पकडण्यात आले.
या अस्वलाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. यादरम्यान सहायक उपवनसंरक्षक लखमावाड, टीटीसीचे डॉ. पोडचलवार, आरआरटी ताडोबाचे अजय मराठे व टीम, क्षेत्र सहायक खनके, वनरक्षक मरसकोल्हे, वनरक्षक गुरनुले, विशेष व्याघ्र संरक्षण दलाची टीम व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल आक्केवार, दिनेश खेवले, अंकुश वाणी, संकल्प गणवीर, प्रतीक लेनगुरे, यश मोहुर्ले उपस्थित होते.