विकास खोब्रागडे
पळसगाव (पिपर्डा) (चंद्रपूर) : चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरीक्षेत्रामधील विहीरगाव परिसरात वाघेडा रस्त्यावरील अशोक रामटेके यांच्या शेतात अस्वल व तिच्या दोन पिल्लांनी गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडला होता. नागरिक दिसले की ही अस्वल त्यांच्या दिशेने धावत होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने शनिवारी दुपारी १.२५ वाजता या अस्वलाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. मात्र आता तिच्या पिल्ल्यांना शोधण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी पायपीट करीत आहेत.
शनिवारी ही अस्वल त्याच परिसरातील मोहन सखाराम चौधरी यांच्या शेतात रस्तावर ठाण मांडून होती. ती सकाळपासून त्याच ठिकाणी होती. अशक्तपणामुळे तब्बल चार तासापासून त्याच ठिकाणी असल्याने वनविभागाची रेस्क्यू टिम तिथे पोहचली. दुपारी १ पासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. १ वाजून २३ मिनिटांनी बेशुद्धचे इंजेक्शन देउन अस्वलीला बेशुद्ध करण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खोब्रागडे यांनी तिची तपासणी केली. पुढील वैद्यकीय तपासणीकरिता मदनापूर येथील वनविभागाच्या राखीव झुनाबाई जंगल परिसरात नेण्यात आले. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी विजय मराठे, पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खोब्रागडे, पोलीस निरीक्षक मनोज गभने, वनपाल मस्के, वनरक्षक मेश्राम उपस्थित होते.
आता पिल्लांचे काय होणार ?
अस्वलीला जेरबंद केले. मात्र तिच्या दोन पिल्ल्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. वनविभागाचे कर्मचारी परिसर पिंजून काढत आहेत. पकडलेल्या अस्वलीला वनविभागाने तपासणीसाठी नेले आहे. अशावेळी तिची पिल्ले सापडले नाही तर त्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.