गोंडपिपरी : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत करंजी येथील ग्रामविकास अधिकारी संजय गोलारवार यांना कर्तव्यावर असताना वैभव निमगडे यांनी मारहाण केली. तसेच कॉलर ओढून कार्यालयाबाहेर काढले. याबाबतची तक्रार गोंडपिपरी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. परंतु, त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामसेवकांत नाराजी पसरली आहे.
४ जुलै रोजी ग्रामविकास अधिकारी गोलारवार हे दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान जि.प. शाळेतील पाण्याच्या आरो मशीनबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. दरम्यान, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वैभव निमगडे यांनी त्यांना काॅल करुन कुठे आहे, अशी विचारणा केली. कामानिमित्त शाळेत आलो आहे, पाच मिनिटात ऑफिसला येतो असे सांगितले. थोड्या वेळात ते कार्यालयात पोहोचले. काही वेळानंतर निमगडे तिथे आले. त्यांनी सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर गोलारवार यांची कॉलर खेचून कार्यालयाबाहेर नेले. तेथे त्यांना गालावर मारहाण केली. हाताची बोटे मुरगाळली. याबाबत त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी अद्यापही त्याच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेमध्ये नाराजी पसरली आहे.
कामबंद आंदोलनाचा इशारा
विनाकारण ग्रामसेवकांना मारहाण केल्यामुळे निमगडे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करुन त्याला अटक करणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी तसे केले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामसेवकांनी ग्रामसेवक संघटना गोंडपिंपरीच्या वतीने निषेध नोंदवला. तसेच गोंडपिंपरी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी अध्यक्ष जितेंद्र खोब्रागडे, सचिव प्रभुदास राऊत, कार्याध्यक्ष प्रेमदास राठोड, उपाध्यक्ष मंगला आकनुरवार, सुनीता कंचर्लावार, गजानन घुगे, अनिता जाधव, देवराव कोडापे, विलास भोयर, आनंद कटकमवार, लीना मेश्राम, साधना पेंढारकर, राजू कापकर, प्रदीप नारनवरे, नरेश कसारे आदी उपस्थित होते.