ग्रामस्थांचे लक्ष वेधत आहेत भिंतीचित्र
बल्लारपूर : राज्य शासनाद्वारे वेळोवेळी अभियान राबविण्यात येते. यात ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रही सहभागी झाले असून बामणी येथील अंगणवाड्याची रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. भिंतीवर काढलेले थोर पुरुषांचे भिंतीचित्र व घोषवाक्य ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे.
अलीकडे विभागातील सर्व कार्यालये व अंगणवाडीची स्वच्छता, रंगरंगोटी ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान सुरू आहे. या माध्यमातून बामणी येथील अंगणवाडीलाही सुशोभित करण्यात आले असून अलीकडेच अंगणवाडीत पेवर्स लावून सुशोभित करण्याचा प्रस्ताव बामणी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष ताजने, उपसरपंच जमील शेख, ग्राम विकास अधिकारी लक्ष्मण शेंडे व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी मंजूर केला आहे. याशिवाय थोर पुरुषांचे प्रेरणादायी चित्र काढून जनजागृतीचे काम केले आहे. यामुळे अंगणवाडी केंद्र बामणी क्रमांक ७ ही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.