ऑनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारपूर या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या वर्धा नदी काठावरील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. किल्ल्याच्या आतील भागाचे सौंदर्यीकरण आणि पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करण्याची कामे बल्लारपूर नगर परिषद करणार आहे.विकासात्मक कामे करण्याची पुरातत्व विभागाकडे नगर परिषदेने तयारी दर्शविली होती. पुरातत्व विभागाने त्याला हिरवी झेंडी दिली आहे. येथील ऐतिहासिक स्थळ गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. या किल्ल्याची वयोमानाप्रमाणे काही ठिकाणी पडझड झाली असली तरी यातील बराचसा भाग आणि नदीकाठा नजीकच्या भिंती सुस्थितीत आहेत. काही भागाची दुरुस्ती पुरातत्व विभागाने नुकतीच केली आहे. परंतु, आतील स्वच्छतेबाबत बोंब होती.किल्ल्यात सर्वत्र उगवणारे गवत आणि इतर हिरव्या कचऱ्यांमुळे किल्ल्यातील बरेचशा वास्तू झाकोळल्या गेल्या होत्या. बल्लारपूर नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन, पुरातत्व विभागाकडून परवानगी घेतली. त्यानंतर किल्ल्याचा आतील भाग स्वच्छ करण्याची मेहिम लोकसहभागातून हाती घेतली. जवळपास अडीच महिने सतत स्वच्छता मोहिम राबवून किल्ला पूर्णत: कचरामुक्त करण्यात आला.या दरम्यान पुरातत्व विभागाच्या चंद्रपूर तथा नागपूर येथील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व या मोहिमेतून किल्ल्याचा झालेला कायापालट बघून ते प्रभावीत झालेत. या कचरामुक्ती अभियानाच्या समारोपप्रसंगी नगर परिषद प्रशानाने किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी दर्शविली आणि पुरातत्व विभागाकडे नगर परिषदेने तसा प्रस्ताव पाठविला.या प्रस्तावाची दखल पुरातत्व विभागाने घेतली व त्या विभागाने नगर परिषदेच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्र नगर परिषदेला पुरातत्व विभागाकडून प्राप्त झाले आहे. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणात बाग, बसण्याकरिता बेंचेस, सौर ऊर्जेतून प्रकाश व्यवस्था, पेयजल व्यवस्था, आवश्यक त्या ठिकाणी लोखंडी द्वार अशी व्यवस्था नगर परिषदेकडून केली जाणार आहे. शहरातील या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे, शहरातील व बाहेरील लोकांना येथे रमता यावे, किल्ल्यामागचा इतिहास लोकांना कळावा या उद्देशाने नगर परिषदेने या कामाकरिता पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांच्या प्रयत्नाने किल्ल्याच्या ढासळलेल्या भिंतीची दुरुस्ती पुरातत्व विभागाने केली.असा आहे बल्लारपूरच्या किल्ल्याचा इतिहासबल्लारपूर येथील किल्ला १३२० साली आदिया बल्लारशाह या राजाने बांधला. येथून सात राजांनी सत्ता गाजविली. बल्लारपूरचा शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाहा याला चंद्रपूरला आजच्या अंचलेश्वर मंदिराच्या जागेवर साक्षात्कार घडला. त्याने प्रभावित होऊन तेथे किल्ला बांधून राजधानी तेथे करण्याचे ठरविले. खांडक्या बल्लारशहाने परकोटाची पायाभरणी केली. राजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्राने परकोट व किल्ला बांधून बल्लारपूरची राजधानी चंद्रपूरला हलविली. तेव्हापासून बल्लारपूरच्या या किल्ल्याचे महत्त्व काहीसे कमी झाले आणि हा किल्ला दुर्लक्षीत राहिला. मात्र, यावर्षी या किल्ल्याची पुरातत्व विभागाकडून चांगली निगा राखली जात आहे. त्यात नगर परिषदेचे सहकार्य मिळत असल्याने लवकरच किल्ल्याचे रूप पालटणार आहे.
दुर्लक्षित किल्ल्याचे सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:58 AM
बल्लारपूर या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या वर्धा नदी काठावरील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देबल्लारपूर नगर पालिकेचा पुढाकार : आतील भागात पर्यटकांसाठी सुविधा