निसर्गरम्य परिसर; पावसाळी पर्यटन
जयंत जेनेकर
कोरपना : तालुक्यातील जेवरा गावालगत असलेला खडक्या धबधबा हौशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे अनेकजण या स्थानी भेटी देत असताना दिसून येत आहे.
कोरपनापासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या, जेवरा गावालगत तांबाडी - तुळसी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर हा धबधबा आहे. त्याच्याच काही अंतरावरून पैनगंगा नदी वाहते. हा संपूर्ण भाग झुडपी जंगलांनी व्यापलेला असल्याने येथील निसर्गसौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते. त्यामुळे पर्यटकांचा ओढा मुख्यत्वे शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी अधिक बघायला मिळतो आहे. नाल्याच्या दगडी चाफातून खळाळणा-या या धबधब्याचे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवताना, इथे चिंब भिजल्याखेरीज अनेकांना मोह आवरत नाही. त्यामुळे या परिसरातील निसर्गसौंदर्याचे केलेले कौतुक तेवढे कमीच आहे.
बॉक्स
धबधबा परिसराचा व्हावा विकास
जेवरा येथील खडक्या धबधबा बघण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात. या दृष्टीने येथे इको पार्क व चिल्ड्रन्स पार्कची निर्मिती करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक व पर्यटकांकडून होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.