लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथे आता पूर्णत्वास येत आहे. या रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करून रुग्णालय सुरू करण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहे.
तब्बल नऊ कोटी रुपये खर्च करून रुग्णालयाची भव्य इमारत नांदा येथे बांधण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालयासाठी जमीन नसल्याने रुग्णालयाचे काम रखडले होते. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतीने जमीन उपलब्ध करून दिली आणि माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या खनिज विकास निधीमधून नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या रुग्णालयाचा फायदा परिसरातील नांदा, बिबी, नोकारी, आवरपूर, पालगाव, राजुर गुडा, लाल गुडा, वडगाव, खिर्डी आदी गावांना होणार आहे.
येथील इमारतीचे काम पूर्णत्वाला आले असून, येथे आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तत्काळ उपलब्ध झाल्यास रुग्णालय सुरु करण्यात अडचण राहणार नाही. वाढत्या औषधांच्या किमती आणि आर्थिक भुर्दंड बघता कमी दरात उपचार घेणे आता शक्य होणार आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णालय सुरु झाल्यास त्याचा फायदा रुग्णांना मोठ्या प्रमाणात होईल. कोरोना विलगीकरण कक्षासाठी जागा असल्याने याठिकाणी तशी व्यवस्था होऊ शकते. तेव्हा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करून रुग्णालय सुरू करण्याची मागणी सरपंच गणेश पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, माजी सरपंच श्यामसुंदर राऊत, महादेव डुकरे, पुरुषोत्तम निब्रड, मनोहर झाडे, लहू गोंडे, सुधाकर चौधरी, मारोती जमदाडे आदींनी केली आहे.
बॉक्स
गडचांदूरच्या हेलपाट्या होणार बंद
अनेक शेतकरी, शेतमजूर, गरीब कुटुंबांना उपचारासाठी गडचांदूर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात जावे लागत होते. यासाठी बराच खर्च व येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता हा त्रास वाचणार असून, नागरिकांना गावातच उपचार मिळणार आहेत.
बॉक्स
वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थानेही सज्ज
या रुग्णालयाकडे जाणारा मार्ग कोरपना-गडचांदूर मुख्य रस्त्याला जोडला गेला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढणार असून, त्यादृष्टीने इमारतीचे काम भव्य स्वरूपात करण्यात आले आहे. सोबतच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचे बांधकामही करण्यात आले आहे. सध्या नांदा हे गाव नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडले आहे. परंतु, अंतर अधिक असल्याने रुग्ण उपचारासाठी नारंडा येथे न जाता गडचांदूर येथे जातात.