वर्षानुवर्षे पिळवणूक : पट्टेवाटपाचा दावा पूर्ण करावातोहोगाव : मागील अनेक वर्षापासून शेती कसत असलेल्या जबरानजोतदार शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मागच्या महिन्यात नोटीस जारी करण्यात आले. त्यामध्ये तीन पिढ्यांपासून जमीन कसत असल्याचा दाखला सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता त्यांना पट्टे देण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे.गेल्या ५० - ६० वर्षांपासून जबरानजोतधारक शेती कसत कुटुंबाचे पालनपोषण करीत आहेत. या जबरानजोतधारकांच्या काही जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असून त्यांना कच्चे पट्टे देण्यात आले. या जबरानजोतधारकांना कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी कोणाला ग्रामसभेचा ठराव, कोणाला वंशवाढ जमिनीचा नकाशा आणि विशेष म्हणजे तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा अशा त्रुटी दाखविल्या आहेत. तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा अतिशय गंभर विषय बनला आहे. कारण प्रत्येक जबरानजोतधारकांचे पूर्वज सुशिक्षित नव्हते. त्या काळात त्यांना पुरेसे ज्ञान अवगत नव्हते. त्या काळात त्यांना स्वत:च्या मालकी हक्काची जमीन नव्हती. हे पूर्वज अज्ञानी असल्यामुळे शाळेत प्रवेश तर सोडाच त्यांच्या जन्माची नोंद केली नाही. ज्यांनी जन्माची नोंद केली, त्यांची चौकशी केली असता ४० ते ५० वर्षापूर्वीची कागदपत्रे ही तहसील कार्यालयात उपस्थित असतात. पण आता ५० ते ६० वर्र्षांचा कालखंड ओलांडून गेला असल्यामुळे ते कागदपत्रे जीर्ण होऊन तुकडे तुकडे पडण्याच्या तयारीत आहेत. जबरानजोतधारकांचे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेताच संबंधित कर्मचाऱ्यांकडून अशी माहिती देण्यात आली की, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ८०-९० वर्षे वयाच्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. पण हा पुरावा गृहीत धरला जाणार नाही. असे ऐकताच जबरानजोतधारकांच्या डोळ्यात अश्रू यायला वेळ लागला नाही. जबरान जोतधारकाला तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्रासाठी गावपातळीवरुन तहसील पातळीवर जाण्यासाठी जबरानजोतधारक वसोबत ८०-९० वर्षे वयाच्या व्यक्तीचा येण्या-जाण्याचा वाहतूक खर्च किमान २०० रुपये सोबत स्टॅम्प पेपर १०० रुपये आणि इतर किरकोळ खर्च १०० रुपये म्हणजेच एक जबरानजोतधारकाला तीन पिढ्याचा रहिवासी पुरवा काढण्यासाठी ४०० ते ४५० रुपयांचा खर्च येतो. संबंधीत कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे एका व्यक्तीचे जवळपास ४०० ते ४५० रुपये खर्च झाले. समजा तालुक्यात पाचशे जबरान जोतधारक असतील तर त्यांचा किती खर्च झाला असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.ज्या जबरानजोतधारकांना कच्चे पट्टे देण्यात आले, त्यांना पक्के पट्टे देण्यात यावे. अनेक जबरानजोतधारक पक्क्या पट्ट्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची मागणी पूर्ण करून तीन पिढ्यांचा रहिवाशी पुराव्याची अट रद्द करण्यात यावी. शासकीय कायद्यानुसार पात्र असणाऱ्यांना पट्ट्याचे वितरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी जबरानजोतधारक मागणी करीत आहेत. (वार्ताहर)स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्राचा पर्यायतीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा पूर्वजांच्या जन्मांच्या नोंदीपासून प्राप्त करता येतो. त्यात काही जबरानजोतधारकांच्या पूर्वजांनी जन्माच्या नोंदी केल्या नाहीत. काही जबरानजोतधारकांना पूर्वजांच्या जन्माचे ठिकाण नेमके कोठे आहे, हेसुद्धा माहिती नाही. त्यामुळे त्यांचे वारस कोणत्या आधारावर तीन पिढ्यांंचा रहिवासी पुरावा प्राप्त करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी शालेय प्रमाणपत्र, जन्मनोंद, कोतवालपंजी आदी माध्यमातून पुरावा प्राप्त करण्यास सांगितले. या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसलेल्या जबरानजोतधारकाने गावातील ८० ते ९० वर्षांच्या व्यक्तीकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जबरानजोतधारकाला तीन पिढ्यांपासून चांगल्या प्रकारे ओळखतो, असे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचे आहे.
तीन पिढ्यांच्या अटीमुळे जबरानजोतदार अडचणीत
By admin | Published: March 01, 2017 12:46 AM