चंद्रपूर : पोलिस बंदोबस्तादरम्यान चक्क बीअर शॉपीमध्ये जाऊन दारू ढोसणाऱ्या दोन पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे. उमेश मस्के, नरेश निमगडे अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
२ जून रोजी ब्रह्मपुरी येथे जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ब्रह्मपुरी उपविभागातील पोलिसांच्या चमूची ड्युटी लावण्यात आली होती. यामध्ये तळोधी पोलिस स्टेशनमधील पोलिसांचाही समावेश होता. यात उमेश मस्के, नरेश निमगडे यांच्यासह अन्य एक कर्मचारीसुद्धा कर्तव्यावर होते. दरम्यान, आंदोलन सुरूच असताना मस्के, निमगडे व अन्य एक कर्मचारी असे तिघेजण कर्तव्यावर असतानाच ब्रह्मपुरी येथील एका बीअर दुकानात गेले. एवढेच नाही तर तेथे बीअर ढोसली. याबाबतच ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांना माहिती मिळताच ते त्या दुकानात गेले. ते तिघेही वर्दीवरच बीअर बारमध्ये दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या संपूर्ण बाबींची चौकशी केल्यानंतर त्यांनी या दोघांनाही निलंबित केले आहे. त्यातील एकजण दारू पित नसल्याने त्याच्यावर कारवाई केली नसल्याची माहिती आहे. या कारवाईवरून कर्तव्यावर असताना दारू ढोसणाऱ्या पोलिसांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.
दारू दुकानाला परवानगी कितीपर्यंत?दारूबंदी हटल्यानंतर जिल्ह्यात दारू दुकान, बीअर शॉपीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दारू दुकानाचा परवाना देताना नियमावली ठरवून दिली जाते; परंतु अनेक दुकानदारांकडून त्याची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. अनेक दुकाने ही रात्री दहा वाजतानंतरही सुरू राहत असल्याचे दिसून येतात. ही कारवाईसुद्धा रात्री १०:३० वाजताच्या सुमारास केली असल्याचे बोलले जात आहे.
तळोधी पोलिस स्टेशन येथील दोन पोलिस शिपाई बिअर ढोसताना आढळून आले. त्यामुळे त्या दोघांना निलंबित केले आहे. त्यांच्यासमवेत असणारा तिसरा कर्मचारी मद्य पित नव्हता. परंतु, त्यावरही दुसरी कारवाई करण्यात येणार आहे.
-रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा पोलिस अधीक्षक, चंद्रपूर.