राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बायोडिझेल हा जैवइंधनाचा दुसरा प्रकार आहे. पॉम स्टिरीन, वापरलेल्या भाजीपाला तेलांपासून आणि काही प्राण्यांच्या चरबीपासून हे इंधन तयार होते. वाहतूक व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव होतीच. शिवाय, इंधनावरील वारेमाप खर्च टाळण्यासाठी चंद्रपुरातील समाजसेवी उद्योजक राणा सिंग यांनी स्वतःचे इंधन स्वत:च तयार करण्याचे धाडस दाखविले. परिणामी, एका वाहनामागचा दररोजचा सुमारे १० ते १२ हजारांचा खर्चही वाचविण्यात त्यांना यश आले. सध्या हे अपारंपरिक जैवइंधन इतरांना न विकता स्वत:साठीच वापर करीत आहेत.जैव इंधन हे अक्षय ऊर्जास्रोत मानले जाते, अशी माहिती देऊन राणा सिंग म्हणाले, आमचा डीएनआर नावाचा वाहतूक व्यवसाय आहे. दररोज शेकडो लिटर डिझेल लागतो. यातून खर्च तरच वाढतच होता दुसरीकडे पर्यावरणाचीही हाणी होत असल्याचे लक्षात आले. वनस्पती पदार्थांच्या बायोमासपासून इंधर तयार होते. हे लक्षात आल्यानंतर ताडाळी येथे २०१९-२० मध्ये दशमेश बायो इनर्जी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी कच्चा माल औरंगाबाद, हैदराबाद व अन्य शहरातून आयात करतो.
एकमेव पर्यावरणपूरक प्रकल्पताडाली येथील प्रकल्पाची दरदिवशी २४ हजार लिटर बायोडिझल उत्पादन करण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या दररोज सुमारे ३ ते ४ हजार लिटर उत्पादन घेतले जात आहे. सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. हा नैसर्गिक व अपारंपरिक असा ऊर्जास्रोत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जैवइंधनाचा हा एकमेव प्रकल्प आहे. सरकारने बायोडिझेल वापरण्यासाठी २५ टक्के अट ठेवली. सरकारच्या सर्व निकषांत हा प्रकल्प यशस्वी ठरला, अशी माहिती राणा सिंग यांनी दिली.
ऑक्सिजनयुक्त इंधन डिझेल इंधनासारच्या वैशिष्ट्यांमुळे बायोडिझेल उच्च कार्यक्षमता डिझेल इंजिनमध्ये वापरली जाते. या इंधनात पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन नसतात. जोखमीशिवाय साठवून ठेवता येते. हे एक नूतनीकरणयोग्य़़, बायोडिग्रेडेबल ऊर्जास्रोत आहे. बायोडिझेलमध्ये उत्कृष्ट गुणधर्म आणि ऑक्सिजनयुक्त इंधन आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील हा नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. नैसर्गिक व अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून इंधन मिळविता येते. इतरांनाही यापासून बोध घ्यावा. व्यवसाय करताना आम्ही पर्यावरणाचा विचार करून हा प्रकल्प उभारला. प्रकल्प सध्या उत्तमरित्या सुरू आहे. नवीन वर्षात पूर्ण क्षमतेने उत्पादन करण्याचा संकल्प आहे. -राणा सिंग, उद्योजक जैवइंधन, चंद्रपूर