ब्रह्मपुरी : भारत सरकारने मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५००, १००० रुपयाच्या नोटा बंद केल्या. त्याचा परिणाम बुधवारी थेट व्यवहारावर दिसून आला.ब्रह्मपुरी येथील बाजारपेठ दर बुधवारी बंद असते. त्यामुळे व्यापाऱ्यांवर देवाण-घेवाणीचा ताण दिसून आला नाही मात्र एटीएम व बँका बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली होती. बहुतांश नागरिकांनी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चिल्लरसाठी पेट्रोल भरण्याचा निमित्त करून जात होते. मात्र तेथेही निराक्षाच हाती आली. पेट्रोल पंपावर ५०० किंवा १००० रुपयाचा पेट्रोल, डिझेल मिळेल, नाही तर चिल्लर पैसे द्यावे लागेल, असा फतवा काढून फलक लावण्यात आलेले दिसून आले. नोटा बदलवायच्या कशा, पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न चौकाचौकात नागरिकांत चर्चीला जात होता. पेट्रोल पंपावरही चिल्लर कुठून येणार हे समजून घेत असताना काही नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंप चालकाशी वादही घातला. पण तो निरर्थक ठरला. ५०० व १००० रुपयाच्या नोटा बंद केल्याचे स्वागतही नागरिकांकडून केले जात होते. तर सर्वसामान्य नागरिकांना लागणारा दैनंदिन व्यवहार मात्र या निर्णयामुळे ठप्प झाल्याचे दिसून आले. बसेस, खाजगी वाहन याद्वारे होणाऱ्या वाहतुकीवरही नोटा बंदचा परिणाम दिसून आला. परिणामी प्रवाश्यांची संख्या रोडावलेली दिसून आली. प्रवासात असणाऱ्या प्रवाशांना नोटा बंद झाल्याची माहिती नव्हती. अशा काही प्रवाश्यांची वाहकांशी हुज्जतही झाली. मात्र दुसरा पर्याय नसल्याने अनेकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.उशिरापर्यंत मशीनवर भरले पैसे ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याची बातमी मंगळवारला सायंकाळी जशी माहीत झाली तसेच ग्राहकांनी आपल्याजवळ असलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी भारतीय स्टेट बँकच्या मशिनवर एकच गर्दी केली. रात्री १ ते दीडवाजेपर्यंत ग्राहकांनी पैसे भरण्यासाठी गर्दी केली होती. मात्र त्यानंतर सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांची गर्दी कमी झाली. ज्या नागरिकांकडे उधार पैसे दिले होते, ते पैसे देण्यासाठी अनेकांनी फोन केल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मात्र नोटा चलनातून बंद झाल्याने ते स्वीकारण्यास जात नव्हते. भाजीबाजार, फुल विक्रेते, पानटपऱ्यावरही ५०० रूपयाची वस्तू खरेदी करूनही नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या.
व्यवहार ठप्प, सर्वसामान्यांना झळ
By admin | Published: November 10, 2016 2:01 AM