धानोरकर दाम्पत्याने घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील बेंडारा मध्यम प्रकल्पाला वेगाने पूर्णत्वास नेऊन जलसाठा निर्माण करून परिसरातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबई येथे भेट घेत परिसरातील शेतकऱ्यांची सिंचन समस्या मार्गी लावण्याची मागणी केली.
या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाचा लाभ व्हावा, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
बेंडारा मध्यम प्रकल्पाचे धिम्या गतीने सुरु असलेल्या कामाला वेग द्यावा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली. तीन हजार ९१५ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पात २७.८८ मिलियन क्युबिक मीटर जलसाठा राहणार असून ३०९ करोड रुपयांच्या या प्रकल्पाचा निश्चितपणे या क्षेत्रातील बळीराजाला लाभ होणार आहे.