या लाभार्थींना तत्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी नगरसेवक राजू महाजन यांनी केली आहे. सदर योजनेत लाभार्थींना घरकुलाकरिता दीड लाख रुपये केंद्र सरकार व एक लाख रुपये राज्य शासनाकडून दिले जाणार होते. वरोरा नगर परिषदेंतर्गत ३२७ प्रकरणे मंजूर झाली. त्यातील ७० घरांची कामे सुरू आहेत. काही घरे पूर्णत्वास आली आहेत. त्यांना राज्य शासनाचा एक लाख रुपयाचे अनुदान मिळाले; परंतु केंद्र सरकारकडून एक रुपयाही मिळालेला नाही. घराच्या बांधकामाकरिता खासगी कर्ज काढून उधारीवर जुळवाजुळव केली. परंतु तीन वर्षांचा कालावधी लोटूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे लाभार्थींना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तीन वर्षांची प्रतीक्षा व अनुदानासाठी परवड लक्षात घेता लाभार्थींना तत्काळ केंद्र सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी नगरसेवक राजू महाजन यांनी केली आहे. या प्रश्नाबाबत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांची राजू महाजन भेट घेणार असून, लाभार्थींना न्याय देण्याची मागणी करणार आहेत.
लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न भंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:24 AM