नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : चंद्रपूर जिल्ह्यातील महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते बंद असल्याने योजनेचा निधी शासनाकडे परत गेला. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही, तर आता बँक खाते सुरू केलेले लाभार्थी शासनाकडे परत गेलेल्या निधीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.
प्राप्त माहितीनुसार, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. या योजनेकरिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पीक कर्जाच्या ५७ हजार ३५७ खातेदारांचा समावेश करण्यात आला होता. त्यांपैकी २२ हजार ३५० खातेदार अपात्र ठरले व ३६ हजार ६०८ लाभार्थी पात्र ठरले होते.
त्यातील आधार प्रमाणिकीकरण केलेल्या ३६ हजार १५२ लाभार्थ्यांकरिता १४५ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर होऊन त्याचे वितरणसुद्धा करण्यात आले. परंतु या पात्र लाभार्थ्यांपैकी २० लाभार्थ्यांचे बँक खाते काही कारणास्तव बंद पडलेले होते. अशा या खातेदारांच्या खात्यात हा प्रोत्साहनपर निधी जमा करण्यास अडचण निर्माण झाली व तो निधी शासनाकडे परत गेला.
जिल्हा उपनिबंधकांनी लाभार्थ्यांना सूचना देऊन बंद पडलेल्या, परंतु नव्याने सुरू केलेल्या २० खातेदारांची माहिती शासनाकडे पाठवून निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे. परंतु निधी न मिळाल्यामुळे या योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित असून शासनाकडे परत गेलेल्या निधीची त्यांना प्रतीक्षा लागलेली आहे.
परत गेलेला निधी त्वरित उपलब्ध करायोजनेच्या लाभार्थ्यांचे बँक खाते बंद असल्याने निधी शासनाकडे परत गेल्याची बाब राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन परत गेलेला निधी त्वरित मिळवून देण्याची मागणी केली आहे.