लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ४५ हजार २९५ महिलांची नोंदणी करण्यात आली. मासिक पाळी चुकल्यानंतर १०० दिवसांच्या आत ए. एन.एमकडे नोंदणी झालेल्या ४४ हजार ३७५ महिलांना मदतीचा पहिला लाभ मिळाला. दुसरा व तिसरा लाभ घेण्यास त्या पात्र आहेत. मात्र, कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळूनही पुर्तता न केल्याने १ हजार ५६० महिलांना अद्याप अनुदाचा लाभ मिळू शकला नाही. दारिद्रय रेषेखालील व या रेषेवरील गर्भवती महिलांना अनुदान देण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू झाली. ही योजना वेतनासह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांना लागू नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी पती व पत्नीचे आधारकार्ड, बँक खाते, माता व बाल संरक्षणकार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात ही योजना ९७.९७ पूर्ण करण्याचे उद्दिष्टे पूढे ठेवण्यात आले.
काय दिली जाते मदत?मासिक पाळी चुकल्यानंतर शंभर दिवसांच्या आत नोंदणी केल्यास पहिला लाभ १ हजार रूपये, शासकीय व खासगी आरोग्य संस्थेत प्रसुतीपूर्व किमान एकदा आरोग्य चाचणी केल्यास दुसरा लाभ २ हजार रूपये तसेच शासकीय व खासगी आरोग्य संस्थेत बाळाचे साडेतीन महिन्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण केल्यास तिसरा लाभ २ हजार रूपये असे एकूण ५ हजार रूपये दिले जाते.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी केली जात आहे. सर्व तालुके तसेच नगर परिषदांमध्ये योजनेद्वारे मदत दिले जाते. जी प्रकरणे कागदपदत्रांअभावी प्रलंबित आहेत त्यांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नोंदणी केलेली एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही. गर्भवती महिला व स्तनदामातेला सकस आहाराकडे विशेष लक्ष आहे.- डाॅ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर