लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना तपासणीकरिता जिल्ह्यातील जे खासगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या खासगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटरचा परवाना रद्द करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिला आहे.आयुवैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-१९ आजाराची अॅन्टीजन टेस्टींगकरिता अॅन्टीजन टेस्टींग सेंटर व आर.टी.पी.सी.आर. टेस्टींग सेंटर असे एकूण २७ ठिकाणी निशुल्क केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच जिल्ह्यात एकूण १७ खासगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर कार्यरत असून त्यांच्याकरिता शासनाने अॅन्टीजन टेस्टींग शुल्क जास्तीत जास्त ८०० रुपये ठरवून दिलेले आहे. यापेक्षा जास्त शुल्क कोणत्याही खासगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटरच्या व्यवसायिकांना आकारता येत नाही. कोणत्याही सेंटर ने ८०० रुपयांपेक्षा जास्त चाचणी शुल्क आकारल्यास याबाबतची माहिती तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्षाला द्यावी.
आरटीपीआरसाठी दोन खासगी सेंटरसध्या जिल्ह्यात डॉ. अतुल चिद्दरवार पॅथेलॉजी लॅब व डॉ. संगई पॅथेलॉजी लॅब या दोन खासगी संस्थेना आर.टी.पी.सी.आर. स्वॅब कलेक्शन सेंटरसाठी जिल्हा स्तरावरून परवानगी देण्यात आलेली आहे व अशा संस्थेलासुध्दा एक हजार ८०० रुपयांपेक्षा जास्त सेवा शुल्क आकारता येत नसल्याचे डॉ. राठोड यांनी कळविले आहे.
अनेक तक्रारी आल्याखासगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटरच्या इन्फ्लुएन्झा (ताप) सदृश्य लक्षणे असल्यास व अॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांचे नमुने हे आर.टी.पी.सी.आर.साठी पाठविणे आनिवार्य असल्यामुळे खासगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर असे नमुने शासकीय व्ही.डी.आर.एल. लॅब, शासकीय वैद्यकीय महाविद्यलाय, चंद्रपूर येथे पाठवितात. या नमुन्यांकरिता शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नाही. तथापि काही खासगी अॅन्टीजन टेस्टींग सेंटर हे आर.टी.पी.सी.आर. टेस्टसाठीदेखील परस्पर अॅन्टीजन टेस्टींगचे सेवाशुल्क ८०० रुपये घेतल्यावरसुध्दा अतिरीक्त सेवाशुल्क आकारत आहे. तशा तक्रारी आल्या आहेत. ही बाब अत्यंत खेदाची आहे. अशा प्रकारच्या घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.