लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात साप, विंचू यांसारखे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. चंद्रपूर जिल्ह्यात केवळ विषारी सापांच्या चारच प्रजाती आढळून येतात. त्यामुळे साप आढळल्यानंतर घाबरुन त्याला मारु नये, सर्पमित्राला बोलवावे, असे आवाहन सर्पमित्रांकडून होत आहे. जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातींच्या सापांचा प्रजनन काळ असतो. पावसाळ्यात जमिनीत लपून बसलेले जीवजंतू बाहेर पडतात, तसेच दुसऱ्या प्राण्यांनी तयार केलेल्या बिडात राहणारे सापसुद्धा भक्ष्य मिळविण्यासाठी व सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी बाहेर येतात. सापांविषयी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत; परंतु सर्वच साप हे विषारी नसतात. सापाला शेतकऱ्याचा मित्र, असे संबोधले जाते; परंतु साप दिसताच घाबरुन त्या सापाला मारले जाते; परंतु सर्वच साप हे विषारी नसतात. आपल्याकडे साधारणत: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चारच प्रजातींचे विषारी साप आढळून येतात. तर इंडियन एग्ज, श इटर, माजऱ्या ही निमविषारी तर बहुतांश साप बिनविषारी आढळून येतात; परंतु दरवर्षी भीती व अंधश्रद्धेमुळे अनेक बिनविषारी सापांना जीव गमवावा लागतो.शेतात किंवा काडीकचरा असलेल्या तसेच ओलावा असणाऱ्या ठिकाणी काम करताना सांभाळून काम करावे, जोपर्यंत सापाला इजा होत नाही. तोपर्यंत तो कुणालाही दंश करीत नाही, त्यामुळे साप दिसताच त्याला न मारता सर्पमित्राला बोलवावे किंवा विषारी साप असेल तर वनविगाला माहिती देवून शेतकऱ्याच्या मित्राचे रक्षण करावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
साप आढळला तरशेतात, काडीकचरा असलेल्या ठिकाणी, छोटे-छोटे बिड असणाऱ्या ठिकाणी साधारणत: साप आढळून येतात. साप दिसल्यानंतर लगेच घाबरुन न जाता, सर्पमित्राला प्राचारण करावे, सर्पमित्र येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवावे. आपल्या समोर एकाच साप असेल तर एकाच जागी स्थिर राहावे, त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्या बाजूला एखादी वस्तू फेकावी. जेणेकरुन त्याचे लक्ष विचलीत होईल. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवावे.
नाग : नागाचे विष सर्वात जहाल असते. नाग ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या फण्याच्या मागील बाजूस दहा किंवा शुन्याचा आकडा असतो. काळ्या किंवा तपकिरी रंगाचे नाग जास्त आढळून येतात.मण्यार : मण्यार किंवा मनेर ही भारतात आढळणारी विषारी प्रजात आहे. मण्यार सापाचे विष नागासारखेच असते. साधारणत: हा साप जंगल परिसरात आढळून येतो. सापाचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी- कमी होत जातात.घोणस : घोणस सापाचे विष अतिशय जहाल असते. या सापाच्या अंगावर साखळीसारख्या, तीन समांतर रेषा असतात. घोणस, हिरवा, पिवळा, हलका करडा रंग, व इतर अनेक रंगछटामध्ये आढळतो.फुरसे : हा साप ग्रामीण भागात फरुड या नावाने ओळखला जातो. यांचा रंग तपकिरी, फिक्कट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूवर एकेक, फिक्कट पांढरी नागमोडी रेषा असते.
साप चावला तरसर्वदंश झाल्यानंतर सापाच्या विषाने मृत्यू होण्यापेक्षा घाबरुन जास्त मृत्यू होत असल्याची उदारणे आहेत. परंतु, साप चावल्यानंतर घाबरुन न जाता ज्या ठिकाणी दंश झाला असेल. त्या ठिकाणाहून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडून मांत्रिकाकडे जावू नये, आपल्या परिसरातील डॉक्टरांकडे जावून त्वरीत उपचार घ्यावा.
नुकताच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. गांव-खेड्यासह शहरी भागात साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. साप निघाल्यास आपल्या संपर्कातील सर्परक्षक,-सर्पमित्र यांना बोलवावे. सापाची माहिती नसेल तर पकडण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता, आवश्यक प्रथमोपचार करा, बुवाबाजी, मांत्रिक किंवा गावठी उपचारात वेळ घालवू नका. सर्पदंशावर शासकीय रुग्णालयात ‘प्रति सर्प विष' उपलब्ध असते. त्यामुळे लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नजिकच्या रुग्णालयात जावे. प्रत्येक साप विषारी नसतो, आपल्यास झालेला सर्पदंश बिनविषारी सापाचा असू शकतो.बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो तथा सर्पमित्र