आरोपींवर कठोर कारवाई करा: चटपल्लीवार कुटुंबीयांची मागणीभद्रावती : मूळचा भद्रावती येथील रहिवासी असलेला पण नोकरीनिमित्त नंदूरबार येथे वास्तव्यंस गेलेल्या विक्की नागेंद्र चटपल्लीवार या २७ वर्षीय युवकाचा परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका शेतात निर्घृण खून करण्यात आला. यासंदर्भात पिंपळदरी पोलिसाननी चार जणांना अटक केली असली तरी हा खून नेमका कशासाठी झाला, हे गुढ कायम आहे. चटपल्लीवार कुटुंबियांनी यासंदर्भात पत्रपरिषद घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.विक्की चटपल्लीवार हा युवक नंदूरबार येथील महिला बचत वित्तीय महामंडळात नोकरी करीत होता. ७ एप्रिलला आपण आपले मित्र ज्ञानोबा बापूराव मुंडे (३०), त्याची पत्नी, बालाजी उर्फ पिंटू सजीव गुटे (२७), चंद्रकांत पंडीत बारी (४०) व अरुण मधूकर फड (२८) यांच्यासोबत शेगावला एमएच- १९ सीएफ ७११७ या स्वीजर गाडीने जात असल्याचे विक्कीने आपल्या कुटुंबाला रात्री १२ वाजता मोबाईलवरुन कळविले होते. मात्र प्रत्यक्षात ते परभणी जिल्ह्याबाहेर गेलेच नाही. ९ एप्रिलला आपण गंगाखेड तालुक्यातील मित्राच्या शेतातून आल्याचे सांगून आपण दोन दिवसानंतर भद्रावतीला येत असल्याचे विक्कीने कुटुंबीयांना कळविले. त्यानंतर ९ तारखेलाच विक्की हरविला असल्याचा फोन त्याच्या मित्रांनी विक्कीच्या घरी केला.त्यानंतर चटपल्लीवार कुटुंबीय गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तुमचा मुलगा या विहिरीत आहे, असे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शरीरावर गळा आवळल्याच्या खूणा होत्या. त्याचा खून करुन दोराच्या सहाय्याने विहिरीत टाकल्याचे लक्षात आले. पोलिसांनी मदत करण्याऐवजी प्रकरण येथेच संपवा, असा सल्ला दिला. तर आरोपींनी तुम्हाला काय करायचे ते करा, अशी असभ्य भाषा वापरली. यावरुन हे प्रकरण पोलीस दाबण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप चटपल्लीवार कुटुंबियाने पत्रकार परिषदेतून केला आहे. पिंपळदरी पोलिसांनी विक्कीच्या चारही मित्रांना अटक केली. त्यांनी खून केल्याची कबुलीही दिली. मात्र खूनाचे कारण अद्याप कळू शकले नाही. या आरोपींना कठोर शिक्षा देऊन मृत विक्कीला न्याय द्यावा, अशी मागणी वडील नागेंद्र चटपल्लीवार, काका जयप्रकाश चटपल्लीवार, भाऊ विशाल, आई उषा चटपल्लीवार व कल्पेश ठक्कर यांनी पत्रपरिषदेतून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
भद्रावतीच्या युवकाचा परभणीत खून
By admin | Published: April 21, 2017 12:58 AM