आयुध निर्माणी : वेकोलि कुनाडा कोळसा खाणीत आवश्यकतेपेक्षा जास्त क्षमतेचे स्फोटक वापरुन करण्यात येणार्या ब्लॉस्टिंगमुळे भद्रावती शहरातील घरांना जोरदार झटके बसत आहेत. शहरवासी अनेकदा वेळीअवेळी भूकंपासारखे धक्के अनुभवत आहेत. या धक्यामुळे घराच्या भिंतींना तडे जात असल्याने भद्रावतीकरात संताप व्यक्त केला जात आहे. भद्रावती शहरापासून काही अंतरावर कुनाडा कोळसा खाण व कर्नाटका एम्टा खासगी कोळसा खदान आहे. खदानीतील कोळसा बाहेर काढण्याकरिता खाणीत ब्लॉस्टिंग करतात. ब्लॉस्टिंगने जमिनीतील कोळसा बाहेर येण्यास मदत होते. ब्लास्टिंगमध्ये स्फोटकाचा वापर किती प्रमाणात करायचा, याचा एक नियम असतो. याबाबत नागपूर येथील डिजीएमएस कार्यालयाकडून प्रमाणके ठरविली जात असून वेकोलितील ब्लॉस्टिंग व नियंत्रण ठेवण्याचे काम हेच कार्यालय करीत असते. वेकोलि प्रशासन डिजीएमएसने ठरविल्यापेक्षा जास्त प्रमाणात स्फोटके वापरणार नाहीत, सुरक्षा नियमाचे उल्लंघन करणार नाही, यासाठी बंधने घातले जाते. परंतु कोळसा उत्पादन वाढविण्याकरिता अनेकदा खदान प्रशासन आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात स्फोटके वापरत असल्याने भद्रावतीतील विंजासन, पांडव वॉर्ड, बंगाली कॅम्प, सावरकरनगर, साने गुरुजी सोसायटी, राधाकृष्ण कॉलनी, सुर्यमंदिर वॉर्ड आदी परिसरात वेळीअवेळी भूकंपसदृश धक्के जाणवतात. ब्लॉस्टिंगचा हा धक्का इतका मोठा असतो की घरांना हादरे बसून भिंतींना तडे जात आहे. अनेकदा घराच्या स्वयंपाक घरातील भांडी खाली पडतात. त्यामुळे वेकोलिवर नागरिकांचा रोष आहे.(प्रतिनिधी)
भद्रावतीकर अनुभवतात भूकंपसदृश धक्के
By admin | Published: May 11, 2014 11:25 PM