चंद्रपूर : शहरातील पाणी समस्या सुटावी, याकरिता उपाययोजना करण्यासाठी आमदार निधी व खनिज विकास निधीतून एक कोटी ४३ लक्ष रुपयांचा निधी महानगरपालिका प्रशासनाला दिला. या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता नियमानुसार ही मंजूर कामे तत्काळ सुरू होणे आवश्यक असतानासुद्धा केवळ महानगरपालिका पदाधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्सर या कामांना विलंब करण्यात येत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. मनपाला जाग व सद्बुद्धी यावी, याकरिता हे आंदोलन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. तसेच हे कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आमदार स्थानिक विकास निधी व खनिज निधीतून मंजूर एक कोटी ४३ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठ्याची कामे तत्काळ सुरू करण्यात यावी, याकरिता सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत भजन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, विश्वजित शाहा, विलास वनकर, राशिद हुसेन, विलास सोमलवार, सलिम शेख, मुन्ना जोगी, अजय दुर्गे, विनोद अनंतवार, आनंद रणशूर, आनंद इंगळे, बबलू मेश्राम, दिनेश इंगळे, राम जंगम, नितीन शाहा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, दुर्गा वैरागडे, कल्पना शिंदे, सविता दंडारे, विमल काटकर, वैशाली मेश्राम, कौसर खान, माधुरी काळे, रूपा परसराम, आशा देशमुख, आदींची उपस्थिती होती.
यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी भजन आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी येत निवेदन स्वीकारले.